Wednesday 6 July 2022

वृक्ष लावा….! वृक्ष जगवा…! पर्यावरणाचे रक्षण करा…!

 



 

वृक्ष हे पर्यावरणातील खूप महत्वाचा भाग आहेत. आपल्या भोवताली असलेली झाडे आपल्याला फक्त सावली देत नाहीत तर वृक्षांपासून आपल्याला अनेक फायदे आहेत. वृक्ष वातावरणातील कार्बन डायऑक्साइड स्वतःकडे घेतात आणि जीवनावश्यक असा ऑक्सिजन आपल्याला देतात. याशिवाय वृक्षांमुळे जमीनीची धूप होत नाही. दुष्काळ पडत नाही. पाऊस चांगला पडतो. यावर्षी जालना जिल्हयाला 82 लक्ष 55 हजार 600 वृक्ष लागवडीचे उदिष्ट देण्यात आले आहे. हे उदिष्ट वेळेत पूर्ण करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी       डॉ. विजय राठोड यांनी सर्व विभागांना केली आहे. जनतेने देखील वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होऊन जास्तीतजास्त वृक्ष लावण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

वन व्यवस्थापन करणे ही आता जणु काळाची गरजच बनत चालली आहे. कारण वृक्ष संवर्धन व वृक्ष संगोपन ही महत्वाची जबाबदारी आपणावर येऊन ठेपली आहे. सततचा दुष्काळामुळे निर्माण झालेल्या कमालीच्या पाणी टंचाईने मनुष्य जीवनासोबत प्राणी जीवनसुद्धा हतबल होत चालले आहे.

विविध कारणांसाठी वृक्षतोड आज मोठया प्रमाणात केली जात आहे. या कारणांमुळे जागतिक तापमान वाढ ही समस्या प्रामुख्याने तोंड वर काढत असल्याचे आपण पाहतो आहे. त्याचा विपरीत परीणाम अप्रत्यक्षरीत्या मानवी जीवनावर होत आहे. पावसाची अनियमितता ही त्याची प्रारंभीक पायरी होय. भरमसाठ वृक्षतोडीमुळे कार्बन उत्सर्जनात झालेली प्रचंड वाढ व जमिनीची होणारी वाढती धूप यामुळे निसर्गचक्रात बदल झाल्याचा विविध घटनांचा कानोसा घेतांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतोच आहोत यात दूमत नाही. त्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन व्हावे ही माफक अपेक्षा आज प्रत्येक व्यक्तींकडुन, सामाजिक संस्थेकडुन केली जात आहे. किंबहुना त्यासाठी अनेक संघटना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कार्य करत असल्याचे आपण पाहतो  आहोत. त्याचबरोबर अपारंपारीक उर्जा स्त्रोतांचा वापर व वृक्ष न तोडण्याचे आवाहनही विविध माध्यमातुन आज होत आहेच.

वृक्ष लागवडीचे महत्व आज ठळकपणे समोर येत आहे. शाश्वत जीवनाचा विचार करुनच पर्यावरणपुरक धोरण जपतांना वृक्ष संपत्ती बद्दल पुरेशी जागरुकता असणे गरजेची बाब आहे. वृक्ष वल्लरी हे आपले आप्त स्वकीयच आहेत. झाडांपासुन आपल्या मुलभुत गरजा पूर्ण होतात. वृक्षांचे अस्तीत्व जर या पृथ्वीतलावर नसेल तर सजीव सृष्टी जीवंत राहु शकणार नाही. किंबहूना फार काळ जगु शकणार नाही.

सध्या आपल्या राज्यात 20.10 टक्के इतके वनक्षेत्र आहे. त्यामध्ये वाढ होणे हे अत्यंत गरजेचे आहे. वृक्ष ही भूतलावरील सर्वात मौल्यवान अशी निसर्गाची देणगी आहे. त्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकुण भुभागाच्या 33 टक्के भुभागावर वनसंपदा असणे आवश्यक आहे, त्यासाठी बेछुट वृक्ष तोड थांबवायला हवी.

वृक्ष आपल्याला फक्त पाने, फुले, फळेच देत नाहीत तर आपल्याला कोणत्याही परीस्थीतीत जगण्याची नवी उमेद, तसेच सकारात्मक उर्जा बहाल करतात. वृक्ष आणि मानवी जीवनाचं नातं निकटचं आहे. वृक्षांमुळेच आपण आहोत ही भावना आपण जपायला हवी, त्यासाठी वृक्षांचे संवर्धन करुन वृक्ष जगवायला हवीत.

चला तर मग, आपल्या स्व: हितासाठी, निकोप नव जीवनासाठी वृक्षारोपण करुया, वृक्षसंवर्धन करुया व उज्जवल भविष्याकडे वाटचाल करुया ! आणि वृक्षारोपणाचा स्वयसंकल्प सिध्दीस नेवुयात. सध्याच्या पावसाळयाच्या वातावरणात प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावण्याचा संकल्प करावा.  तसेच त्या वृक्षाची जोपासना देखील करावी.  वृक्ष जगले तरच पर्यावरणाही सुरक्षित राहील.

--- जिल्हा माहिती कार्यालय,

                                                                    जालना 

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment