Tuesday 5 July 2022

शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक व्यवसायाच्या प्रशिक्षणाचे आयोजन करा -- जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड



 

            जालना दि. 5 (जिमाका):-  पारंपरिक शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीपुरक व्यवसायाच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आत्मा नियामक मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते.

            बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भीमराव रणदिवे, आत्माच्या प्रकल्प संचालक श्रीमती शितल चव्हाण, जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, केव्हीकेचे शास्त्रज्ञ डॉ. एच.एम.आगे, डॉ. एस.आर. धांडगे, डॉ. पी.एल. सोनटक्के, अतुल लड्डा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, पारंपरिक शेती करत असताना शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी शेतीपूरक व्यवसाय करण्याची गरज आहे.  त्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पशुपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन याबरोबरच हमखास व भरघोस उत्पन्न देणाऱ्या रेशीम लागवड यासारख्या शेतीपूरक व्यवसासायांचे प्रशिक्षण देण्यात यावे.  या प्रशिक्षणाच्या माध्यमातुन शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात उत्पन्न वाढीस मदत होईल.  तसेच जालना जिल्ह्यात द्राक्ष व मोसंबी या फळपिकांची चांगल्या प्रमाणात लागवड करण्यात येते.  द्राक्षापासुन तयार करण्यात येणाऱे बेदाणे निर्मितीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे मोसंबीची लागवड करण्यात आलेली आहे अशा प्रत्येक ठिकाणी मोसंबी लागवडीचे जिओ टॅगिंग करण्यात येऊन त्याचा तपशिल कृषि विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी दिले.

            प्रकल्प संचालक श्रीमती शितल चव्हाण यांनी आत्माच्यावतीने शेतकऱ्यांसाठी पिक प्रात्यक्षिके, राज्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षण तसेच शेतीशाळांचे आयोजन करण्यात येऊन याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला असल्याची माहिती दिली.

-*-*-*-*-*-


No comments:

Post a Comment