Tuesday 5 July 2022

जिल्ह्यात दि. 5 व 7 जुलै रोजी विजेच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

 

 

जालना दि. 5 (जिमाका) :- प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सुचनेनुसार जालना जिल्ह्यात दि. 5 जुलै व 7 जुलै 2022 या कालावधीत विजेच्या कडकडाटासह,ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

दि. 5 जुलै रोजी तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची व ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने वाढळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. दि. 7 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

विजेपासून स्वत:चे करा रक्षण

            पावसाळयाच्या दिवसात आकाशातून अंगावर वीज कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागतात. यामध्ये मनुष्य प्राण्यासोबतच अनेक मुक्या जनावरांचाही  मृत्यू होतो. ही प्राणहानी टाळण्यासाठी पुरेक्षा प्रमाणात दक्षता घेतल्यास जीव वाचवता येऊ शकतो. आकाशात विजा चमकत असल्यास कोसळणाऱ्या विजेपासून स्वत: चे रक्षण करण्यासाठी खालील दक्षता घ्यावी.

हे करा --

• शेतात काम करीत असताना शेताजवळील घराचा त्वरित आसरा घ्यावा. विद्युत उपकरणे बंद ठेवावीत.

• शेतात काम करीत असाल व सुरक्षित ठिकाणचा आसरा घेतला नसेल तर शक्यतो जिथे आहात तेथेच रहा.

• शक्य असेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टीक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवा, तथापि डोके जमिनीवर ठेऊ नका.

• ओल्या शेतात अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे, पोहणारे, मच्छिमारी करणारे यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.

• झाडाच्या उंचीपेक्षा झाडापासून दुप्पट अंतरावर उभे रहा. एखादे उंच झाड सुरक्षित ठेवायचे असल्यास उंच वृक्षाच्या खोड अथवा फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे, म्हणजे हे झाड सुरक्षित होईल.

• वीजवाहक वस्तूपासून दूर रहा. उदा. रेडीयटर, स्टोव्ह, मेटल, लोखंडी पाईप, टेलिफोनचे खांब, विजेचे खांब, टेलिफोन टॉवर यांपासून दूर रहा. मजबूत असलेले पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे.

• जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्या. वृक्ष, दलदलीच्या ठिकाणे तथा पाण्याचे स्रोत यापासून शक्यतो दूर रहा. तथापि मोकळ्या आकाशाखाली असण्यापेक्षा लहान झाडाखाली आसरा घेणे चांगले. मोकळ्या आकाशाखाली राहणे आवश्यकच असेल तर खोलगट ठिकाणी रहा.

हे टाळा –

• विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका.

• झाडाखाली उभे राहू नका, उंच जागेवर, झाडावर चढू नका.

• पाण्याचे नळ, फ्रिज, टेलिफोन यांना स्पर्श करु नका.

• धातूंच्या वस्तूंपासून दूर रहा.

• प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नका. दूरध्वनीचा वापर करू नका.

• गांव, शेत, आवार, बागबगीचा आणि घर यांच्या भोवती तारेचे कुंपन घालू नका, कारण ते विजेला सहजतेने आकर्षित करते.

• दोन चाकी वाहन, सायकल, ट्रक, ट्रॅक्टर, नौका यांवर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा. अशावेळी वाहनातून प्रवास करू नका.

• वाहनाच्या बाहेर थांबणे आवश्यक असल्यास, धातूचे कोणतेही उपकरण हातात बाळगू नका.

• एकाच वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र राहू नका. दोन व्यक्तीमधील अंतर किमान 15 फूट असेल असे रहा.

• धातूची दांडी असलेल्या छत्रीचा उपयोग करू नका.

------

पूर परिस्थितीत काय करावे, काय करु नये..!

 

       अतिवृष्टीमुळे अचानक  पूर परिस्थिती  निर्माण होवून भीतीचे वातावरण तयार होते.  पुरामुळे मोठया  प्रमाणात जिवीत व वित्त हानीही  होते. मात्र, पुर परिस्थितीत घाबरुन  न जाता  वेळीच उपाययोजना केल्यास पुरापासून उदभवणाऱ्या धोक्यातून नक्कीच  बचाव करता येऊ शकतो.  पूर आल्यास  नक्की काय करावे किंवा काय करु नये, याबाबतची माहिती  या लेखातून मांडण्यात आली आहे.   

पूर परिस्थितीत काय करावे --

आपल्या भागात अतिवृष्टीची परिस्थिती असल्यास तात्काळ तालुका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा व परिस्थिती बाबत कळवावे. तसेच गावचे तलाठी, पोलिस पाटील यांनाही कळवावे. जिल्हा नियंत्रण कक्षासही दुरध्वनीव्द्वारे तात्काळ कळवावे. जवळच्या तहसील कार्यालयातून आपल्या गावासाठी निश्चित करण्यात आलेल्या जवळच्या सुरक्षित स्थलांतर करण्यासाठीच्या ठिकाणांची माहिती करून घ्यावी. जेणेकरून पूर परिस्थिती उदभवल्यास त्याचा उपयोग होईल. पुरादरम्यान उकळलेले अथवा क्लोरीनद्वारे शुध्द केलेले पाणी प्यावे.  खाण्याचे पदार्थ झाकून ठेवावेत. जास्त आहार घेवू नये किंवा हलका आहार घ्यावा. पूर परिस्थितीमध्ये बैलगाडी, कृषी उपयोगी मशिन, पाळीव प्राणी यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जावे. आपातकालीन बॉक्स नेहमी आपल्या जवळ बाळगावा. ज्यामध्ये एक छोटा रेडिओ, बॅटरी, पाणी, कोरड्या स्वरूपातील अन्नपदार्थ, मेणबत्ती, माचिस इ. आवश्यक वस्तुंचा समावेश असावा. आपातकालीन परिस्थितीमध्ये जर स्थलांतर करण्याच्या सूचना मिळाल्यास सर्वात पहिले थंडीपासून बचाव करणारे कपड़े, औषधी, मौल्यवान वस्तु, वैयक्तीक महत्वाची कागदपत्रे वॉटरप्रूफ पिशवीमध्ये भरून सुरक्षित ठेवावेत. आपातकालीन परिस्थितीमध्ये शोध व बचाव कार्य करणाऱ्या पथकाला संपूर्ण सहकार्य करावे. पूर परिस्थितीमध्ये ताज्या घटनांसाठी अथवा काही सूचना मिळण्यासाठी रेडिओ / टीव्ही यांचा उपयोग करावा.

 पूर परिस्थितीत काय करू नये --

            अतिवृष्टीच्या वेळी नदीस पूर आला असल्यास नदी दुथडी भरून वाहत असल्यास कोणत्याही परिस्थितीत नदी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.  लहान मुलांना पुराच्या पाण्याजवळ जावू देवू नये. नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास वाहनाद्वारे अथवा इतर कोणत्याही पद्धतीने पूल पार करण्याचा प्रयत्न करू नये.  घरात पाणी घुसण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास सर्वप्रथम विजेचे सर्व कनेक्शन बंद करावे. पुरामुळे प्रभावित झालेल्या विद्युत उपकरणांचा वापर करण्यापूर्वी त्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्याचा उपयोग करू नये. अशा कोणत्याही पदार्थांचे सेवन करू नये जे पुराच्या पाण्याने प्रभावीत झालेले आहे. अफवांवर लक्ष देवू नये अथवा अफवा पसरवु नयेत.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment