Monday 25 July 2022

जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत राष्ट्रीय नमूना पाहणी क्षेत्र कार्यक्रमास प्रारंभ राष्ट्रीय नमुना पाहणीस परिपुर्ण व योग्य माहिती देऊन नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

 


 

जालना दि. 25 (जिमाका) :- महाराष्ट्र शासन, नियोजन विभागाअंतर्गत अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत राष्ट्रीय नमुना पाहणी 79 वी फेरीचे क्षेत्रकाम करण्यात येणार आहे. सदर पाहणीचा विषय CAMS (Comprehensive Annual Modular Survey) आणि आयुष पध्दतीबाबत सर्वेक्षण असा आहे.  या विषयावर विस्तृत माहिती संकलीत केली जाणार असल्याची माहिती अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय, औरंगाबादचे सहसंचालक, डॉ.किरण गिरगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  राष्ट्रीय नमुना पाहणीस परिपुर्ण व योग्य माहिती देऊन नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी,  कुंदन कांबळे यांनी केले आहे.

राष्ट्रीय नमूना पाहणी ही जुलै, 2022 ते जून, 2023 या कालावधी दरम्यान होणार असून सदर पाहणीच्या पत्रक CAMS अंतर्गत शाश्वत विकास ध्येय निर्देशक तयार करण्याच्या उद्देशाने आवश्यक प्राथमिक माहिती गोळा केली जाईल. विविध सामाजिक आर्थिक परिमाणांमध्ये देशाच्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी तसेच जागतिक स्तरावर तुलना करणेसाठी खालील निर्देशकांची माहिती संकलीत केली जाईल. या पाहणीदरम्यान पुढील मुद्यांप्रमाणे माहिती गोळा करण्यात येईल. मागील 12 महिन्यांतील औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये तरुण आणि प्रौढांचा सहभागाचा दर, मागील 3 महिन्यांत अथवा मागील 365 दिवसांत इंटरनेट वापरणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण, सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या सुविधा वापरणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण, 15-24 वर्षे वयोगटातील शिक्षण, रोजगार आणि प्रशिक्षणामध्ये सहभाग असलेल्या तरुणांचे प्रमाण, बारमाही रस्त्यालगतच्या 2 कि.मी. परिसराच्या आत राहणाऱ्या ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण, वित्तीय संस्थेत खाते असलेल्या प्रौढांची टक्केवारी, वित्तीय संस्थेत खाते असलेल्या महिलांची टक्केवारी, प्रति 1 लाख प्रौढांमागे कर्जदारांची संख्या, वैयक्तीक मोबाईल फोन असलेल्या व्यक्तींचे स्त्री-पुरुष प्रमाण, लोकसंख्येचे प्रमाण, साबण आणि पाण्याने हात धुण्याची सुविधा उपलब्ध असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण, वीज उपलब्ध असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण, बँक किवा इतर वित्तीय संस्थेत किंवा मोबाइल मनी सेवा प्रदात्यांमध्ये खाते असलेल्या प्रौढांचे (15वर्षे आणि त्याहून अधिक) प्रमाण, कौशल्याच्या प्रकारानुसार माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान कौशल्ये असलेले तरुण आणि प्रौढांचे प्रमाण, कमी/जास्त प्रवासी क्षमतेच्या सार्वजनिक वाहतूक थांब्यापासून 0.5/ 1 कि.मी. अंतराच्या आत असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण, घरापासून 500 मीटरच्या आत खुल्या जागेचा परिसर असणाऱ्या कुटुंबांचे प्रमाण, तंत्रज्ञानानुसार मोबाईल नेटवर्क असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण तसेच आयुष पध्दतीबाबत सर्वेक्षणअंतर्गत आयुष पध्दतीचा वापर याबाबत कुटुंबांकडून माहिती गोळा करण्यात येणार आहे. आयुष पध्दतीची माहिती असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी, पाहणीच्या अगोदर मागील 365 दिवसात आयुष पद्धतीद्वारे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी, रुग्णालयात दाखल केल्यावर उपचार घेण्यासाठी वापरलेली आयुष पध्दती (आयुर्वेद, योगा आणि नॅचरोपॅथी, युनानी, सिध्दा आणि होमिओपॅथी) बाबत माहिती. पाहणीच्या अगोदर मागील 365 दिवसांत उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यावर आयुष पद्धती व आयुष औषधांवर झालेला खर्च, गेल्या 365 दिवसांत आयुष औषधांचा वापर करून उपचार घेतलेल्या बाह्य रुग्णांची टक्केवारी, प्रसूतीपूर्व आणि प्रसुतीपश्चात आयुष औषधांचा वापर याबाबतची विस्तृत माहिती गोळा करण्यात येणार आहे.

या सर्वेक्षाणांतर्गत राज्य शासनाकडून नियुक्त कर्मचाऱ्यांमार्फत माहिती गोळा करण्यात येणार आहे. पाहणीच्या निष्कर्षांचा उपयोग राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर आरोग्यविषयक धोरणे आखण्यासाठी व नियोजनासाठी होणार आहे. सदर राष्ट्रीय नमुना पाहणीस परिपुर्ण व योग्य माहिती देऊन नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी,  कुंदन कांबळे यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment