Friday 1 July 2022

एकल प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांवर नगर पालिकेमार्फत दंडात्मक कारवाई जिल्ह्याच्या पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी कोणीही एकल प्लॅस्टिकचा वापर न करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आवाहन

 




 

      जालना दि. 1 ( जिमाका):- पर्यावरणाचे हित लक्षात घेता एकल प्लास्टिक वापरावर शासनाने 1 जुलै 2022 पासून संपूर्णतः बंदी घातली आहे. जालना जिल्ह्यातही एकल प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी निर्देश दिले आहेत. एकल प्लास्टिक वापरावर बंदीच्या निर्णयाची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असून आज दि.1 जुलै रोजी जिल्ह्यातील विविध तालुक्यात नगरपालिकेच्यावतीने  दुकानामध्ये अचानक धाडी टाकून  एकल प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत दंड वसूल करण्यात आला.

     एकल प्लास्टिकच्या वापरामुळे  पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार परतूर व भोकरदन, जाफराबाद तालुक्यासह जिल्ह्यातील इतर तालुक्यातही एकल प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

 आपला जालना जिल्हा स्वछ, सुंदर राहण्याबरोबरच जिल्ह्यात पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीसाठी वृक्ष लागवड करण्यावर भर देत जिल्ह्याच्या पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी कोणीही एकल  प्लॅस्टिकचा वापर न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment