Monday 18 July 2022

स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवांतर्गत ''हर घर तिरंगा '' उपक्रमात जिल्हा वासियांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 



 

          जालना, 18 जुलै (जिमाका):- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी. या उद्देशाने स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022  या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार "हरघरतिरंगा" हा उपक्रम राज्यासह जालना जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. "हर घर तिरंगा" या उपक्रमात जालना जिल्हा वासियांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

                                                 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त "हर घर तिरंगा" या उपक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते.

                                                 बैठकीस उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती शर्मिला भोसले,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) संजय इंगळे, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, तहसिलदार संतोष गोरड, एमएसआरएलएम चे समन्वयक शैलेश चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

         जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणले  "हर घर तिरंगा" या उपक्रमात लोकसहभाग अत्यंत महत्वाचा असुन  असून जिल्ह्यातील चार लक्ष घरांवर भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकाविण्याचे नियोजित आहे. या उपक्रमात जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गावागावातील, नागरीकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा. ध्वज फडकवत असताना ध्वजसंहितेचे पालन होईल, याची काळजी घेण्यात यावी.  जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांवरही ध्वज फडकविण्यात यावा.  या उपक्रमात लोकप्रतिनिधींनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन करत शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी संघटनांनीही स्वयंस्फुर्तीने झेंडे उपलब्ध करुन घेत ते शासकीय, निमशासकीय इमारती, गाव या ठिकाणी फडकविण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी केले.

     "हर घर तिरंगा" हा उपक्रमांतर्गत शासनाच्या नियमानुसार ध्वज 30 इंच बाय 20 इंच आकाराचा किंवा लांबी रुंदीचे प्रमाण 3:2 आयताकार आकारात असावा, तिरंगा ध्वज (झेंडा) फक्त कापडी असावा. जिल्ह्यात ध्वज फडकविण्याबाबत करण्यात आलेल्या नियोजनानुसार पुरेशा प्रमाणात ध्वज उपलब्ध होण्याबरोबरच नागरिकांना योग्य किंमतीमध्ये ध्वज उपलब्ध होतील यादृष्टीनेही काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. जालना जिल्ह्यात हा उपक्रम अत्यंत उत्स्फुर्तपणे राबविला जाईल, यादृष्टीने जनमानसामध्ये "हर घर तिरंगा" या उपक्रमाबाबत व्यापक स्वरुपात जागृती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी दिले.

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment