Wednesday 22 July 2020

शेतकऱ्यांनी पीकास आवश्यकतेनुसार युरिया खताचा वापर करावा



            जालना, दि. 22 (जिमाका):-    सन 2018-19 खरीप हंगामात 51812 मेट्रीक टन व खरीप हंगाम 2019-20 मध्ये 54363.00 मेट्रीक टन युरिया खताची जिल्हयात विक्री झालेली होती. मागील दोन वर्षाच्या तुलनेत जिल्हयात 12263 मेट्रीक टन अतिरिक्त युरिया खत चालु खरीप हंगामात उपलब्ध झालेला असुन  यापुढेही जिल्हयात युरिया खताचा पुरवठा सुरु राहणार असल्याने शेतकऱ्यांनी आवश्यकतेप्रमाणेच युरिया खताची खरेदी करावी. बाजारात बारीक व मोठा युरिया उपलब्ध असून शेतकऱ्यांकडुन बारिक युरियासाठी मागणी होत आहे. सध्या जिल्हयामधील सर्वच तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस असल्याने व मोठा युरिया निम कोटेड पिकास हळुहळु उपलब्ध होत असल्याने बारिक युरियाच्या तुलनेत अधिकचा फायदेशीर आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी बारिक व मोठा युरिया असा भेदभाव न करता बाजारात उपलब्ध असलेला युरिया खरेदी करावा, असे आवाहन जिल्हा कृषि विकास अधिकारी बी.एस. रणदिवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
जालना जिल्हयात चालु खरीप हंगामात 165190 मे.टन रासायनिक खताचे नियोजन मंजुर असून आजपर्यंत मागील वर्षातील शिल्लक व चालु वर्षातील पुरवठा असा 223223 मेट्रीक टन रासायनिक खत उपलब्ध झाले आहे. त्यापैकी युरिया खताचे 57520 मेट्रीक टन नियोजन मंजुर असून जुलै-2020 अखेर एकुण 66626.00 मेट्रीक टन युरिया खरीप हंगामात उपलब्ध झालेला आहे.दि.22 जुलै, 2020 पर्यत शेतकऱ्यांना 57852 मेट्रीक टन युरिया खताची जिल्ह्यातील विविध कृषि सेवा केंद्रामार्फत विक्री करण्यात असुन 8774 मे. टन युरिया जिल्ह्यात शिल्लक असल्याची माहिती  कृषि विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जिल्हयातील क्षेत्रीय भेटीचे वेळी पीक पाहणी करीत असतांना व शेतकऱ्यांशी चर्चा केली असता सोयाबीन पीक पिवळे पडत असल्याने काही शेतकरी सोयाबीन विकास युरिया खताचा वापर करीत असल्याचे दिसुन आले तेव्हा शेतकऱ्यांनी सोयाबीन पिक पिवळे दिसत असल्यास प्रती लिटर पाण्यामध्ये 3-4 ग्रॅम फेरस सल्फेट या पाण्यात विरघळणाऱ्या खताची फवारणी करावी. सोयाबीन पिकास वाढीच्या अवस्थेत युरिया खत देण्याची शिफारस नसल्याने युरिया खताचा वापर टाळावा, असे आवाहन सभापती ,कृषि व पशुसंवर्धन समिती सौ.प्रभाताई विष्णुपंत गायकवाड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे व कृषि‍ विकास अधिकारी भिमराव रणदिवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
*-*-*-*-*-**

No comments:

Post a Comment