Wednesday 29 July 2020

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत जालना जिल्ह्यात 7 शासकीय तर 11 खासगी रुग्णालयांमधुन उपचार जिल्हा शासकीय रुग्णालय, दीपक, संजिवनी,विवेकानंद रुग्णालयातुन कोव्हीड बाधितांवर योजनेंतर्गत उपचार जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती



        जालना, दि. 29 (जिमाका):- महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत जालना जिल्ह्यात 18  रुग्णालयातुन या योजनेंतर्गत उपचार करण्यात येत असुन यामध्ये 7 शासकीय तर 11 खासगी रुग्णालयांचा समावेश आहे.  सद्यस्थितीमध्ये कोव्हीड आजारावर पाच स्पेशालिटीअंतर्गत 20 आजारांचा समावेश करण्यात आला आहे.  जालना जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालय, दीपक हॉस्पीटल, संजिवनी हॉस्पीटल,विवेकानंद हॉस्पीटल या रुग्णालयातुन कोव्हीड बाधितांवर योजनेंतर्गत उपचार करण्याबरोबरच जिल्हा रुग्णालय, दीपक हॉस्पीटल संजिवनी हॉस्पीटल येथे अतिगंभीर स्वरुपाच्या कोव्हीड बाधितांवर उपचार करण्यात येतात.  योजनेंतर्गत उपलब्ध असणाऱ्या स्पेशालिटीनुसारच कोव्हीड रुग्णांना लाभ देय असुन लक्षण नसलेले किंवा सौम्य, मध्यम लक्षण असलेले परंतु कोव्हीड बाधित असणाऱ्या रुग्णांना योजनेंतर्गत खासगी रुग्णालयात कुठल्याही प्रकारचा लाभ  देण्यात येत नाही. परंतू जिल्हा शासकीय रुग्णालयात संपुर्णत: मोफत उपचार करण्यात येतात. या योजनेच्या अधिक माहितीसाठी www.jeevandayee.gov.in, रुग्णालयातील आरोग्यमित्र अथवा टोल फ्री क्र. 155388 18002332200 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
        महाराष्ट्र राज्यामध्ये प्रधानमंत्री जनआरोग्य महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य या दोनही योजना संलग्नरित्या राबविण्यात येतात. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लाभार्थी हे 2011 च्या सामाजिक आर्थिक जातीनिहाय जनगणनेनुसार पात्र आहेत.  तसेच या योजनेंतर्गत 5 लाख रुपये प्रतिकुटूंब आरोग्य विमा लागू आहे.  महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत गंभीर अशा 996 उपचार पद्धतीचा समावेश केला गेला आहे. हॉस्पीटलमधील उपलब्ध तज्ज्ञ सेवेनुसार रुग्णांना लाभ दिला जातो. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये सर्व रेशनकार्ड धारकांचा समावेश करण्यात आला असुन केशरी, पिवळे रेशनकार्डधारक, अन्नपुर्णा अंत्योदय योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी  शेतकरी कुटूंब तसेच पांढरे रेशनकार्ड धारक, नोंदणीकृत बांधकाम कामगार या सर्वांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या नागरिकांकडे रेशनकार्ड उपलब्ध नाही अशा नागरिकांना तहसिलदार यांच्याकडून देण्यात आलेल्या रहिवाशी प्रमाणपत्रावर लाभ देण्यात येईल. योजनेंतर्गत नव्याने 67 सीजीएचएस उपचार पद्धतीचा समावेश करण्यात आला असुन यामध्ये नॉर्मल प्रसुती किंवा सिजर, गर्भपिशवीचे आजार तसेच शासकीय रुग्णालयात राखीव असलेल्या 120 उपचार पद्धतींचा खासगी संलग्नित रुग्णालयांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
        महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी पिवळे, पांढरे, केशरी रेशनकार्ड, अन्नपुर्णा अंत्योदय योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी ,नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे नोंदणी प्रमाणपत्र, शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांसाठी पांढरे रेशनकार्ड 7/12 चा उतारा, 6 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकांसाठी जन्माचा दाखला, आई किंवा वडीलांचे ओळखपत्र, रेशनकार्ड फाटलेले अथवा काही त्रुटी असतील तर दुय्यम शिधापत्रिका अथवा तहसिलदारांचे प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र ज्यामध्ये आधारकार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुक इतर शासनमान्य ओळखपत्रांची आवश्यकता आहे. तसेच         जालना जिल्ह्यामध्ये कोव्हीड 19 वर उपचारासाठी बेडच्या उपलब्धतेसाठी अधिक माहितीसाठी रुग्णालयातील वैद्यकीय समन्वयक यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
*******


No comments:

Post a Comment