Friday 24 July 2020

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या संकल्पनेतुन कोव्हीड योद्धयांना प्रोत्साहन देण्यासाठी “एम्प्लॉई ऑफ द वीक” उपक्रम राबवणार दर आठवड्याला 10 हजार रुपयांच्या रोख पारितोषकासह सन्मानपत्राने गौरविणार पहिल्या आठवड्यातील बक्षिसांची रक्कम जिल्हाधिकारी स्वत: देणार प्रत्येक अधिकाऱ्याने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन



            जालना, दि. 24 (जिमाका):- कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्सेस, सेवक सफाई कर्मचारी हे जालना येथील कोव्हीड रुग्णालयात अत्यंत चांगली सेवा देत असुन उत्कृष्ट काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या संकल्पनेतुन एम्प्लॉई ऑफ वीक हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  उत्कृष्ट काम करणाऱ्यांना एकुण १० हजार रुपयांचे रोख बक्षिस, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र  बिनवडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिली.
            कोरोनामुळे आरोग्य विभागातील डॉक्टरांवर कोरोनाबाधितांवर उपचाराची मोठी जबाबदारी असुन या काळात  डॉक्टर, नर्सेस, सेवक सफाई कर्मचारी हे स्वत:ची, आपल्या कुटूंबाची पर्वा करता दिवसरात्र काम करत आहेत. अशा कोव्हीड योद्ध्यांचा सन्मान करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असुन याच भावनेतुन एम्प्लॉई ऑफ वीक हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  प्रत्येक आठवड्यामध्ये उत्कृष्ट डॉक्टरला 4 हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रशस्तीपत्र, उत्कृष्ट नर्स 3 हजार रुपये, उत्कृष्ट वॉर्डबॉय 2 हजार रुपये तर उत्कृष्ट सफाई कर्मचाऱ्याला 1 हजार रुपयांचे रोख बक्षिस प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
            कोव्हीड योद्ध्यांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन देणे सर्वांचे कर्तव्य असल्याने या उपक्रमासाठी शासनाच्या कुठल्याही निधीचा वापर करता स्वयंस्फुर्तीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  पहिल्या आठवड्यातील बक्षिसाची रक्कम जिल्हाधिकारी स्वत: देणार असुन जिल्ह्यातील इतर शासकीय अधिकाऱ्यांनी या उपक्रमात सहभागी  होऊन कोव्हीड योद्धयांना प्रोत्साहन देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी केले.
            या बैठकीस उप विभागीय अधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले, डॉ. जगताप आदींची उपस्थिती होती.
******* 








No comments:

Post a Comment