Wednesday 15 July 2020

जालना शहरातील लॉकडाऊमध्ये 20 जुलैपर्यंत वाढ - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे




जालना दि. 15 (जिमाका) :- कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जालना शहरांमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये  जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधींशी झालेल्या विचारविनिमियानुसार 20 जुलै, 2020 रोजी सकाळी 9:00 वाजेपर्यंत वाढ करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री. बिनवडे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, तहसिलदार भुजबळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
      जालन्यामध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला असून ही अतिशय चिंतेची बाब आहे. यावर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेतील व महसूल विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. कोरोनाची साखळी तुटून वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी सांगितले.
·          रुग्णांचा शोध, तपासणी व अलगीकरण यावर भर देण्यात येत असून कोरोना बाधितांचा अत्यंत कमी वेळेमध्ये अहवाल देणाऱ्या अँटिजेंन किटच्या माध्यमातून तपासण्या करण्यात येणार. जिल्ह्यात 2 हजार किट उपलब्ध असून आणखीन 2 हजार 500 किट्स उपलब्ध होणार आहेत.
·         प्रत्येक खासगी दवाखान्यामध्ये कोव्हिड बाधितांवर उपचारासाठी दवाखान्यातील  उपलब्ध खाटांच्या  80 टक्के खाटा राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून या ठिकाणी बाधितांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या खाटा नियमाप्रमाणे देण्यात येत आहेत की नाही  याची पाहणी करण्यासाठी प्रत्येक दवाखान्यामध्ये  नायब तहसीलदारांची  नियुक्ती करण्यात येणार आहे.
·         लॉकडाऊनच्या काळात जालना शहरामध्ये ज्यांना मधुमेह, हृदयरोग यासारखे आजार असलेल्या   60 वर्षावरील 13 हजार व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यांचे ब्लड प्रेशर, ऑक्सिजनची पातळी, रक्तामधील साखरेचे प्रमाण दैनंदिन तपासणीसाठीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले.
·         जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रूपांतर कोव्हिड रुग्णालयात करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील खासगी दवाखान्यातील प्रत्येक डॉक्टरांनी सात दिवस कोव्हिड रुग्णालयात त्यांची सेवा देणे  बंधनकारक केले आहे. तसेच कुठल्याही शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करू नये. जर प्रॅक्टिस करताना आढळून आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार
·         जालना शहरांमध्ये 36 स्पॉटमध्ये सहा आरोग्य पथकामार्फत तपासण्या करण्यात येत असून कोरोनामुळे वाढत चाललेला मृत्यूदर कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत.
·         महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील 11 हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून कुठल्याही प्रकारची आगाऊ रक्कम न घेण्याची सूचना या हॉस्पिटलला देण्यात आल्या असून याची तपासणी करण्यासाठी शासकीय लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली.
·         कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांची साथ महत्वाची आहे. आपल्या जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रत्येकाने शिस्त पाळावी, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, अनावश्यक घराबाहेर पडू नये, सर्दी, ताप, खोकला व इतर काही लक्षणे असल्यास तपासणी करून घ्यावी.
                                                             -*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment