Thursday 13 July 2023

राज्य महिला आयोग महिलांच्या तक्रारी निवारणासाठी प्रयत्नशील - सदस्या ॲड .संगीता चव्हाण आपल्या तक्रारी बेधडकपणे महिला आयोगाला कळवा

 




        जालना, दि.14 (जिमाका):- महिलांना आपले अधिकार माहिती असणे आवश्यक आहे. महिला आपल्या हक्कांसाठी जागृत होण्यासाठी महिला आयोग हा  काम करत आहे. जिल्ह्यातील विविध आस्थापनेत  महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसुन येत आहेत.  महिलांच्या समस्याबाबत महिला आयोग अतिशय संवेदनशील असून आपल्या तक्रारी बेधडकपणे महिला आयोगाला कळवा, राज्य महिला आयोग महिलांच्या तक्रारी निवारणासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड .संगीता चव्हाण यांनी दिले.

         गुरूवार दि.13 जुलै 2023 रोजीच्या भेटी दरम्यानच्या दौऱ्यात जिल्हा समन्वयक ॲड. पी. जी. गवारे, औद्योगिक व सुरक्षा उपसंचालक डी. आर. खिरोडकर, जिल्हा कामगार अधिकारी अमोल जाधव, डी.एस.खरे यांच्यासह  संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

          राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. चव्हाण म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग तुमच्यासाठीच कार्यरत असून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोग विशेष भूमिका घेत असतो. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत  तक्रार निवारण समिती असणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील विविध आस्थापनांची तपासणी करण्यात येऊन प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारची समिती स्थापन झालेली आहे का? याची खातरजमा करण्यासाठी आज अचानक भेट देत तपासणी करण्यात येत आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी महिला आयोग कार्यरत असून असंघटित क्षेत्रात ज्या ठिकाणी महिला कार्यरत असतील त्या ठिकाणी आयोग तुमच्या बरोबर असेल. एखादी महिला आयोगापर्यंत पोहोचू शकत नसल्याने आम्ही स्वतः महिलांपर्यंत पोहोचण्याचे काम करत आहोत. महिलांनी अन्यायाला प्रतिकार करण्याची मानसिकता ठेवावी. जेणेकरून महिलांवर अन्याय होणार नाही. प्रत्येक आस्थापनेत महिला आयोगाचा व 112 हा टोल फ्री क्रमांक दर्शनीय भागात फलक स्वरूपात लावावा. आशा सूचनाही त्यांनी विविध कंपन्यांना दिल्या. 

        यावेळी जालना शहर परिसरातील कलश सीड्स कंपनी, डी मार्ट मॉल, दिव्या फूड कंपनी, सफल सीडस कंपनी आणि विक्रम टी प्रोसेसर कंपनी बोरखेडी येथे भेट देत महिला कामगारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन तसेच ते वापरलेले पॅड नष्ट करण्याची मशीन, पाळणाघर तसेच स्वतंत्र शौचालयासह आराम खोली तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. यावेळी संबंधित कंपनीचे एचआर व्यवस्थापक, यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment