Monday 24 July 2023

जिल्ह्यातील खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील -- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ जिल्हास्तर क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीराचे थाटात उद्घाटन

   





                             

  

जालना, दि.24 (जिमाका) :-  खेळाडूंना नियमिपणे खेळण्यासाठी मैदानासह इतर प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता प्रशासनाकडून निश्चितपणे प्रयत्न केले जातील. तसेच कुठलाही खेळाडू खेळाच्या सुविधांपासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी  दिली.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यामाने जेईएस महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, प्राचार्य गणेश अग्निहोत्री, क्रीडा संघटक तथा तज्ञ प्रशिक्षक पी.जे.चाँद,  प्रशांत नवगिरे, क्रीडा अधिकारी  रेखा परदेशी, क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, महमंद शेख, सोपान शिंदे यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, खेळातसुध्दा उत्तम करियर करता येवू शकते, पण याबाबत अनेक कुटूंबांत आजही पाहिजे तशी स्विकारर्हता नाही. मात्र खेळातूनही चांगले करियर घडविलेले अनेक व्यक्तीमत्व आपल्यासमोर आदर्श म्हणून आहेत. खेळाडू हा कधीही तरुणच राहतो तो वृध्दामध्ये गणला जात नाही. दहा दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक निवासी प्रशिक्षणातून तयार झालेल्या  क्रीडा शिक्षकांनी आपल्या या प्रशिक्षणातील अनुभवाच्या जोरावर  विविध खेळ प्रकारात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम खेळाडू तयार करण्याचे कार्य करावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना म्हणाल्या की, जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व असून शिक्षकांनी विविध क्रीडा प्रशिक्षण प्रकारात सहभाग नोंदविणे आवश्यक आहे.  जिल्हा परिषदेकडून जिल्हा परिषदेची निवासी क्रीडा प्रबोधिनी सुरु आहे. त्यात 100 मुलांना प्रशिक्षण देण्यात येते. या प्रबोधिनीतील खेळाडू राज्य, राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत. ‍शिबीरात प्रशिक्षण घेतलेल्या क्रीडा शिक्षकांनी उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे कार्य करावे.

जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विद्यागर यांनी  प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, सध्या पारंपारिक खेळासोबतच नवनवीन खेळांचे प्रकार आले आहेत.  तंत्रज्ञानाच्या या जगात खेळात व खेळाच्या धोरणात विविध बदलही घडून आले आहेत. हे बदल क्रीडा शिक्षकांना माहिती व्हावेत यासाठी  जिल्ह्यातील 100 शिक्षकांना निवासी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरातून प्रशिक्षीत होवून जिल्ह्याचा क्रीडा आलेख उंचावण्यासाठी क्रीडा शिक्षकांनी कार्य करावे. कार्यक्रमास क्रीडा शिक्षक व जेईएस महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment