Thursday 13 July 2023

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

    जालना, दि. 14 (जिमाका) -- जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याबाबत  शालेय शिक्षण व  क्रीडा विभागाच्या सूचना आहेत.

त्यानुसार अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत - सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्ष राहील. इच्छुक उमेदवारांनी अर्जासोबत PPO आदेशाची प्रत जोडावी. मानधन रु.20,000/-प्रतीमाह (कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त) राहील. जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील.  बंधपत्र / हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत करार पध्दतीने शिक्षकीय पदाचे विहीत काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील, या आशयाचे बंधपत्र/ हमीपत्र घेण्यात यावे. या बंधपत्रामध्ये / हमीपत्रामध्ये करार पध्दतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही, याचा उल्लेख करण्यात यावा. जालना जिल्ह्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना हे पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागवून नियुक्ती आदेश देण्यात येईल. संबंधित शाळेतील रिक्त शिक्षकीय पदाची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे अत्यावश्यक पदावर नियुक्ती देण्यात येईल.

वरीलप्रमाणे करण्यात आलेली नियुक्ती नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असेल.

वरीलप्रमाणे नियुक्त्या 15 दिवसांच्या आत करणे आवश्यक असल्याने इच्छुक उमेदवारांनी दिनांक 18 जुलै 2023 रोजीपर्यंत शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद जालना येथे कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची संबंधितानी नोंद घ्यावी. वरील संपूर्ण प्रक्रिया ही आयुक्त (शिक्षण) यांच्या नियंत्रणाखाली पूर्ण करण्यात येईल. सदर प्रक्रिये संदर्भात आवश्यकता असल्यास मा. आयुक्त (शिक्षण) यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित केल्यास त्या सर्व संबंधितांना बंधनकारक राहतील, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                             -*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment