Friday 21 July 2023

सेंट मेरी हायस्कुल येथे कायदेविषयक शिबिर संपन्न

 


 

जालना, दि. 21 (जिमाका) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व इनरव्हिल क्लब ऑफ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सेंट  मेरी हायस्कुल, जालना कायदेविषयक शिबीर घेण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन प्राचार्य मनोज तिरके, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा एम. मोहिते, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती पी.पी. भारसाकडे-वाघ, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एन.ए. वानखडे, इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा शिखा जी. गोयल, ॲड. अश्विनी धन्नावत हे उपस्थित होते.

          प्रमुख वक्ते म्हणुन न्यायाधीश वर्षा एम. मोहिते यांनी लैंगीक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण, कायदा 2012 या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुलांचा त्यांच्या जवळच्या लोकांकडून किंवा ओळखीच्या लोकांकडून लैंगिक छळ होण्याची शक्यता अधिक असते. सहसा मुलं त्याबद्दल बोलत नाहीत त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना बोलतं केलं पाहिजे. मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत जे मार्गदर्शन केले जात आहे त्याबाबत मुलांनी इतरांना सुध्दा माहिती द्यावी. विशेष म्हणजे ही कार्यशाळा पालक व शिक्षकांसमक्ष घेतली जात आहे याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. जी गोष्ट आपल्याला खटकते व आपल्यासोबत काहीतरी चुकीचे वर्तन कुणीतरी करत आहे असे वाटल्यास, त्वरित आपल्या आई- वडीलांकडे,शिक्षकांकडे मुल तक्रार करु शकतात, असे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष शाळेंनी मुलांना मनमोकळेपणाने तक्रार करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी असे आवाहन केले. मुलांना न्यायालयीन प्रक्रीयेबाबत माहिती देतांना ही बाबसुध्दा सांगितली की, बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पुर्णत: गोपनीयता बाळगली जाते. वर्तमान पत्रात सुध्दा पीडित मुलीचे नाव व ओळख समजेल असा मजकुर दिला जात नाही. म्हणुन मुलांनी अशा प्रकरणात पुढे येऊन तक्रार करावी असे त्यांनी सांगितले.

          प्रास्ताविक श्रीमती पी.पी. भारसाकडे-वाघ यांनी केले. त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा तर्फे असलेल्या योजनां संदर्भात विस्तृतपणे विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच श्रीमती एन.ए. वानखडे यांनी बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा 2015 या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिखा जी. गोयल यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच ॲड . अश्विनी धन्नावत यांनी बालकांचे हक्क या विषयावर मार्गदर्शन केले.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment