Tuesday 11 July 2023

जिल्ह्यात दुचाकीसाठी नवीन नोंदणी मालिका सुरु; आपल्या पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज करावेत

 

 

जालना दि.11 (जिमाका) :- जालना जिल्ह्यासाठी नॉन ट्रान्सपोर्ट टु व्हीलर मोटार सायकल नोंदणी मालिका एमएच 21 बी वाय- ही सद्यस्थितीत सुरु असून या  मालिकेतील क्रमांकाचे वाटप पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने नॉन ट्रान्सपोर्ट टु व्हीलर मोटार सायकल वाहनांसाठी एमएच- 21 बी झेड- 0001 ते 9999  ही मालिका दि. 12 जुलै 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे. तरी ज्या वाहन धारकांना पसंतीचा नोंदणी क्रमांक घ्यावयाचा असेल त्यांनी आपला विहीत नमुन्यातील अर्जासोबत राष्ट्रीयकृत बँकेचा मुळ किमतीचा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट, ओळखपत्राच्या छायांकीत प्रतिसह पॅनकार्ड व दुरध्वनी क्रमांकासह गुरुवार दि.13 जुलै 2023 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत कार्यालयात जमा करावेत. असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

नवीन मालिकेतील आकर्षक क्रमांकाचे वाटप 'महाराष्ट्र मोटार वाहन नियम' व परिवहन आयुक्तांचे परिपत्रकानूसार करण्यात येईल. तसेच एकाच आकर्षक क्रमांकासाठी अनेक अर्जदारांनी अर्ज केल्यास त्यासाठी विहीत पध्दतीने लिलावाची प्रक्रीया अवलंबिण्यात येईल. एका क्रमांकासाठी एका पेक्षा जास्त अर्ज आलेले असतील तर एका क्रमांकासाठी एका पेक्षा जास्त आलेल्या अर्जदारांनी वाढीव रकमेचा एक धनाकर्ष आणणे आवश्यक आहे. पहिला धनाकर्ष मुळ किंमतीचा व दुसरा धनाकर्ष आपण लावलेल्या बोलीच्या वाढीच्या रकमेचा असावा. सदरील धनाकर्ष विहीत शुल्कापेक्षा सर्वात जास्त रकमेचे ज्यांचे असतील त्यांनाच सदर क्रमांक आरक्षित करुन दिला जाईल. सर्व संबंधितांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांचे नावे आपले धनाकर्ष बंद लिफाफ्यात दि. 14 जुलै 2023 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत सादर करावेत. वेळेनंतर कोणत्याही सबबीवर धनाकर्ष जमा करुन घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. दुपारी 3 वाजता बंद लिफाफे उघडण्यात येणार असून त्यावेळी सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे. असेही कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment