Friday 1 March 2024

गोदा समृध्दी जालना कृषी महोत्सवाचे थाटात उदघाटन शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योगांवर भर द्यावा -- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ - 5 मार्चपर्यंत सुरु राहणार कृषी महोत्सव - जालन्यातील कलश सिड्स मैदानावर महोत्सवाचे आयोजन - अत्याधुनिक शेती अवजारे, सिडस कंपन्यांचे स्टॉल, शेतीला लागणाऱ्या विविध साहित्यांच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी

 

               














जालना, दि. 1 (जिमाका) :- जालना जिल्ह्यातील शेतकरी नाविन्यपूर्ण विचार करतात. आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग ते तत्परतेने राबवित असतात. शेतकऱ्यांनी सधन व आर्थिक दृष्टया सक्षम होणे गरजचे आहे. तरी शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योगांवर अधिक भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. 

 प्रकल्प  संचालक (आत्मा)  व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालना यांच्यावतीने पाच दिवसीय गोदा समृध्दी जालना कृषी महोत्सवाचे कलश सिडस मैदान, जालना येथे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन आज जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे, आत्माचे प्रकल्प संचालक जितेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

      मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले, शासनाची बांबु लागवडीसाठी अडीच एकरासाठी 7 लक्ष रुपयांची अनुदान योजना आहे. तर रेशीम शेतीमध्ये 4 लक्ष रुपयांचे अनुदान मिळते.  तरी  शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेकानेक योजना शासनाकडून राबविण्यात येत असून आपणास अनुकूल अशा योजनेची निवड करुन त्या योजनेचा फायदा घ्यावा. आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नेहमी जास्त प्रमाणात नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय चालु केल्याने उत्पन्न वाढले असल्याचेही बऱ्याचशा ठिकाणी दिसून येते. शेतकऱ्यांनी उद्योजकप्रमाणे विचार करणे गरजेचे झाले आहे. आपल्या शेतीमधील एक इंच ही जमीन रिकामी न ठेवता पुरेपुर वापर करावा, बांधावर चिंच अथवा इतर लागवड करुन आपले उत्पन्न वाढवावे, अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना म्हणाल्या की, भारत हा कृषीप्रधान देश आहे.  आपली अर्थव्यवस्था ही कृषी व कृषी संबंधित उद्योगांवर आधारीत आहे. प्रगत शेतीसाठी अशा कृषी महोत्सवाची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांनी कृषी महोत्सवात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेत आपल्या शेतीत त्याचा वापर करुन उत्पादन क्षमता वाढवावी. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी विभागीय कृषी उपसंचालक डॉ. तुकाराम मोटे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनीही मार्गदर्शक केले.

प्रास्ताविकात श्री. शिंदे म्हणाले की, जालना शहरात दि. 5 मार्च 2024 पर्यंत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना विविध निविष्ठा, अवजारे, सिंचन साधने तसेच इतर तंत्रज्ञानाची माहिती होवून विक्री होण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याबरोबरच खवय्यांसाठी खाद्य दालने उपलब्ध आहेत.

 प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी कृषी महोत्सवात उभारण्यात आलेल्या 200 स्टॉलला भेट देऊन माहिती जाणून घेतली. या ठिकाणी महिला स्वयंसहाय्यता बचत गट, ट्रॅक्टर व त्याची उपसाधने, निविष्ठा, तंत्रज्ञान, विविध बँका, आत्मा तसेच विविध विभागांचे दालने उभारण्यात आली आहेत.   कार्यक्रमास शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment