Thursday 21 March 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 प्रचारासाठी वापरण्‍यात येणाऱ्या वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावण्यासाठी नियमांचे पालन करावे

 


 

जालना, दि. 21 (जिमाका)- मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने निवडणूकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे, यासाठी बंधने घालण्यात आली आहेत. त्यासाठी  जिल्हादंडाधिकारी, जालना यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144अन्वये खालील प्रमाणे निर्बंध घातले आहेत.

फिरत्या वाहनांवर पक्षप्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंडो स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून  2 फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनावर कापडी फलक वाहनचालकाच्या आसना मागे वाहनाच्या डाव्या व उजव्याबाजुने लावण्यात यावा, ईतर कोणत्याही बाजुस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांनी  निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक 6 जून 2024 पर्यंत) अंमलात राहतील, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment