Monday 4 March 2024

10 वी 12 वी इयत्तेच्या खेळाडुंना गुणवाढीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

 


जालना, दि. 4 (जिमाका) :- जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या खेळाडूंसाठी जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त खेळाडू विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याबाबत शासन निर्णय आहे. त्याअनुषंगाने जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्यप्राप्त व सहभाग नोंदविलेल्या खेळाडूंना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यात येणार आहेत.

     इयत्ता 10 वीमध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्याने इ.6 वी ते इ. 10 वीमध्ये शिकत असतांना क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या उच्चतम स्तरावरील स्पर्धेचा लाभ क्रीडा सवलत गुणाकरीता घेता येईल, त्यासाठी संबंधित खेळाडू इ.10 वी मध्ये शिकत असताना क्रीडा स्पर्धेत सहभागी असणे आवश्यक आहे.

 

       इयत्ता 12 वी मध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्याने  इ. 6 वी ते इ. 12 वीमध्ये शिकत असतांना क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या उच्चतम स्तरावरील स्पर्धेचा लाभ क्रीडा सवलत गुणाकरीता घेता येईल. त्यासाठी संबंधित खेळाडू इ.12 वीमध्ये शिकत असताना क्रीडा स्पर्धेत सहभागी असणे आवश्यक आहे. परंतु प्रमाणपत्राच्या आधारे त्याने इ.10 वी मध्ये लाभ घेतलेला नसावा. जर लाभ घेतला असल्यास पुनःश्य क्रीडा गुण सवलत मिळणार नाही, तथापी संबंधित खेळाडूने इ. 11 वी व इ. 12 वी मध्ये सहभाग / प्राविण्य प्राप्त केले असेल तर त्याला गुण अनुज्ञेय आहेत. इ. 12 वी मध्ये असलेल्या खेळाडूने इ. 10 वीची गुणपत्रिका व क्रीडा सवलत गुण घेतलेल्या स्पर्धा प्रमाणपत्राची प्रत प्रस्तावासोबत जोडणे बंधनकारक आहे.

      जिल्हयातील खेळाडू विद्याथ्यांचे प्रस्ताव संबंधित शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक यांनीच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना यांचेकडे विहीत नमुन्यातील प्रस्ताव मूळ दोन प्रतीत दि. 20 मार्च, 2024 पर्यंत सादर करावे, खेळाडू किंवा पालक यांचे मार्फत प्रस्ताव कार्यालयात स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

       विहित मुदतीनंतर आलेले प्रस्ताव स्विकारण्यात येणार नाहीत किंवा उपरोक्त मुदतीत कोणत्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही. अधिकच्या माहिती करीता क्रीडा अधिकारी डॉ. रेखा परदेशी यांना (मो.नं. 9022951924) संपर्क साधावा असे अवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  अरविंद विद्यागर यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment