Friday 1 March 2024

खरीप हंगाम-2023 दुष्काळामुळे शेतीपिकांच्या नुकसानपोटी जालना जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदानासाठी 382 कोटी निधी मंजूर शेतकऱ्यांना निधी वितरणाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची तहसिलदारांना सूचना

 


जालना, दि. 1 (जिमाका) – खरीप हंगाम-2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरीता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली असून जालना जिल्हयासाठी रुपये 382 कोटी 21 लक्ष 69 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने मागणी केल्याप्रमाणे शासनाने निधी मंजूर केला आहे. एवढ्या मोठया प्रमाणात मागणीप्रमाणे निधी मंजूर केलेला जालना जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे. बाधित शेतकऱ्यांना या निधीचे वितरण करण्यासाठी याद्या अपलोड करण्याचे काम व निधी वितरणाची पुढील प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी संबंधित तहसिलदारांना केली आहे.

 

            खरीप हंगाम-2023 करीता दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषि विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरीता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्यशासनाच्या निधीमधून एकूण रुपये 2 हजार 443 कोटी 22 लक्ष 71 लक्ष इतका निधी वितरीत करण्यास महसूल व वन विभागाच्या दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात आली आहे.

 

            खरीप हंगाम-2023 मध्ये दुष्काळाने जालना जिल्हयातील भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड आणि मंठा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. या नुकसानपोटी जिल्हा प्रशासनाने मागणी केलेल्या निधीनुसार शासनाने रुपये 382 कोटी 21 लक्ष 69 हजार इतका निधी मंजूर केला. तालुकानिहाय बाधित शेतकऱ्यांची संख्या व मंजूर निधीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 

भोकरदन तालुका बाधित शेतकऱ्यांची संख्या 1 लक्ष 9 हजार 680, मंजूर निधी रुपये 92 कोटी 33 लक्ष 35 हजार. जालना तालुका बाधित शेतकऱ्यांची संख्या 91 हजार 452, मंजूर निधी रुपये 79 कोटी 9 लक्ष 90 हजार. बदनापूर तालुका बाधित शेतकऱ्यांची संख्या 49 हजार 510, मंजूर निधी रुपये 51 कोटी 90 लक्ष 65 हजार. अंबड तालुका बाधित शेतकऱ्यांची संख्या 97 हजार 728, मंजूर निधी रुपये 110 कोटी 94 लक्ष 69 हजार. मंठा तालुका बाधित शेतकऱ्यांची संख्या 58 हजार 848, मंजूर निधी रुपये 47 कोटी 93 लक्ष 10 हजार.

***

No comments:

Post a Comment