Thursday 11 June 2020

आरोग्य, कृषी व पणन या विषयावर अधिकाऱ्यांनी साधला जनतेशी फेसबुकलाईव्हद्वारे संवाद


जालना, दि. 11 - (जिमाका):- जनतेच्या मनातील असलेले प्रश्न, शंका यांचे निरसन व्हावे यादृष्टीकोनातुन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या संकल्पनेतुन सुरु करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा जनतेशी फेसबुक लाईव्ह संवाद या उपक्रमांतर्गत आज दि. 11 जुन रोजी आरोग्य, कृषी पणन या विषयावर अधिकाऱ्यांनी जनतेशी फेसबुकलाईव्हद्वारे संवाद साधत जनतेनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातून झालेल्या या फेसबुक लाईव्ह प्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांची उपस्थिती होती.
            आरोग्य या विषयावर जनतेशी संवाद साधताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड म्हणाले, जालना जिल्ह्यात कोव्हीड बाधितांना त्वरेने उपचार मिळावेत यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे तसेच जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या पुढाकारातुन कोव्हीड हॉस्पीटलची उभारणी करण्यात आली. तसेच शहरातील विवेकानंद हॉस्पीटल, मिशन हॉस्पीटल, दीपक हॉस्पीटल, वेदप्रकाश आयुर्वेदीक महाविद्यालय, गुरुगणेश होमिओपॅथिक, वरुडी येथील दवाखान्यांमध्ये कोव्हीड बाधितांवर उपचारासाठी खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत.  त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये कोव्हीड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली असुन या ठिकाणी सुमारे 1 हजार 700 खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्यामध्ये जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत कमी होती.  परंतू परराज्य, परजिल्ह्यातुन आलेल्या व्यक्तींमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या सहवासितांचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करणे तसेच त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.  कोव्हीडबाधितांना आवश्यक ते औषधोपचार करण्याबरोबरच त्यांची प्रतिकार शक्ती वाढून हे रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी रुग्णांना पौष्टीक आहारही देण्यात येत असल्याची माहितीही डॉ. राठोड यांनी यावेळी दिली.
            संशयित रुग्णांच्या लाळेचे अहवाल आजघडीला तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवावे लागत आहेत.  राज्याचे सार्वजनिक आरोग्य कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन जालना येथे आरटीपीसीआर लॅबला मंजुरी मिळाली असुन ही लॅब येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये कार्यान्वित करण्याच्यादृष्टीने काम करण्यात येत आहे.  ही लॅब सुरु झाल्यास लाळेचे अहवाल जालना येथेच तपासता येणार असुन अहवाल केवळ 6 ते 12 तासांमध्ये उपलब्ध होणार असल्याने रुग्णांवर उपचार करणे सोईचे होणार आहे.  नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे.  गर्दीच्या अथवा सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन, मास्कचा, सॅनिटायजरचा वापर करण्याबरोबरच प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करत नागरिकांनी आरोग्य विषयक विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी यावेळी दिली.
            कापुस खरेदी (पणन) या विषयावर नागरिकांशी संवाद साधताना उपजिल्हा निबंधक नानासाहेब चव्हाण म्हणाले,  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला कापूस पडून राहता प्रत्येकाचा कापुस खरेदी होण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या आदेशानुसार ज्या शेतकऱ्याकडे कापुस आहे त्याची पहिली छाननी करण्यात आली.  दुसरी छाननीही करण्यात येत असुन ती 15 जुन रोजी पुर्ण होणार आहे. 
            जिल्ह्यात सीसीआरचे सात तर कॉटन फेडरेशनचे दोन अशा एकुण  9 केंद्राच्या माध्यमातुन जिल्ह्यात कापसाची खरेदी करण्यात येत आहे.  जिल्ह्यातील 14 जिनिंगच्या माध्यमातुन कापसाची खरेदी होत असुन आजपर्यंत 1 लाख 64 हजार 871 क्विंटल कापसाची खरेदी ही ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे.  जिल्ह्यात असलेल्या जिनिंग तातडीने सुरु करण्याचे निर्देश प्रशासनामार्फत देण्यात आले होते. ज्यांनी जिनिंग सुरु केल्या नाहीत अशांना नोटीसा बजावण्याबरोबरच कारवाईही करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
            प्रत्येक गरजु शेतकऱ्याला पीककर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सुचना जिल्ह्यातील सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. बँकांतील कर्मचारी परठिकाणाहुन अपडाऊन करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचे प्रवासाचे रद्द करण्यात आले असुन  असे कोणी कर्मचारी अपडाऊन करत असल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहनही श्री.चव्हाण यांनी केले.
            कृषीविषयक माहिती देताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री शिंदे म्हणाले, जालना जिल्ह्यात खरीपाचे               5 लाख 32 हजार हेक्टर क्षेत्र असुन यावर सोयाबीन, मका, कापूस, तुर पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी करण्यात आली असुन 17 हजार क्विंटल सोयाबीन तर 11 लाख कापुस बियाणाचे पाकिटे उपलब्ध आहेत.  1 लाख 55 हजार मे.टन रासायनिक खत उपलब्ध असुन 75 मे. टन खताची विक्रीही करण्यात आली आहे.  शेतकऱ्यांना खताचा तुटवडा भासणार नाही, याच नियोजन करण्यात आले असल्याचे सांगत फळपीकयोजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, सामुहिक शेततळे योजना, शेतीशाळा या योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी यावेळी दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर व अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे
दि. 12 जुन 2020 रोजी साधणार फेसबुकद्वारे जनतेशी संवाद
   दि. 12 जुन रोजी ग्रामीण आरोग्य व प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपचाराबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. विवेक खतगावकर हे सायं.4-00 ते 4-30 या दरम्यान जनतेशी संवाद साधतील तर सायं 4-30 ते 5-00 या वेळेत अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे हे गौणखनिज तक्रार तसेच विविध परवानग्याबाबत माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या https://www.facebook.com/diojalna या फेसबुक खात्यावरून जनतेशी संवाद साधून माहिती देणार आहेत.
*******

No comments:

Post a Comment