Tuesday 9 June 2020

11 ते 16 जुन दरम्यान अधिकाऱ्यांनी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधावा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी


जालना, दि. 9 (जिमाका):- जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नांचे निराकरण व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी नुकताच फेसबुकलाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. या फेसबुक लाईव्हला जनतेने उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिला.  जनतेच्या मनामध्ये आरोग्य, कृषी,पाणीटंचाई, गौणखनिज, दुष्काळी अनुदान, पीककर्ज, रोजगार हमी योजना, पुरवठा, शाळा असे अनेक प्रश्न असुन या प्रश्नांचे उत्तर त्यांना मिळावे यासाठी दि. 11 ते 16 जुन 2020 दरम्यान सायंकाळी  4-00 ते 5-00 दरम्यान सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी फेसबुकलाईव्हद्वारे जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत. ज्या प्रश्नांची उत्तरे वेळेअभावी फेसबुकलाईव्हद्वारे देणे शक्य होणार नाही, अशी उत्तरे लेखी स्वरुपात जनतेला देण्यात यावीत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशामध्ये नमूद केले आहे.
            दि. 11 जुन  2020 रोजी सायं. 4-00 ते 4-30 या वेळेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड हे आरोग्य विषयक असलेल्या बाबींची माहिती देण्याबरोबरच जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणार असुन सायं. 4-30 ते 5-00 या वेळेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नानासाहेब चव्हाण हे कापुस खरेदी (पणन), महात्मा ज्योतिबा फुले पीककर्ज योजना या विषयावर तर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे हे पीकविमा, पीककर्ज, खरीप हंगाम, पोखरा योजना, खते, बि-बियाणे व कृषि विषयक योजनांची माहिती देतील.
         दि. 12 जुन रोजी ग्रामीण आरोग्य व प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपचाराबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. विवेक खतगावकर हे सायं.4-00 ते 4-30 या दरम्यान जनतेशी संवाद साधतील तर सायं 4-30 ते 5-00 या वेळेत अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे हे गौणखनिज तक्रार तसेच विविध परवानग्याबाबत माहिती देतील.
        दि. 13 जुन रोजी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता श्री. डाकोरे हे सायं. 4-00 ते 4-30 दरम्यान पाणीटंचाई व उपाययोजना या विषयावर नागरिकांशी संवाद साधतील तर सायं. 4-30 ते 5-00 दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड हे पीएम किसान, दुष्काळी अनुदान, ई-फेरफार या विषयावर माहिती देऊन जनतेनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतील.
            दि.15 जुन रोजी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित माहिती देण्याबरोबरच जनतेशी उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर हे संवाद साधणार असुन सायं. 4-30 ते 5-00 या वेळेत उपजिल्हाधिकारी भुसंपादन गणेश निऱ्हाळी हे भुसंपादन बाबीविषयक माहिती देतील.
            दि. 16 जुन रोजी पुरवठा विषयक बाबींची माहिती सायं. 4-00 ते 4-30 दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसैय्ये या देणार असुन जिल्ह्यातील शाळा सुरु करणे तसेच त्याअनुषंगाने असलेल्या प्रश्नांची उत्तरे शिक्षणाधिकारी प्राथमिक कैलास दातखीळ व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शोभा गरुड या 4-30 ते 5-00 या वेळेत देणार आहेत.
            दि. 11 ते 16 जुन, 2020 दरम्यान जिल्हयातील विविध अधिकाऱ्यांचा हा फेसबुक लाईव्ह संवाद जनतेला  https://www.facebook.com/diojalna या फेसबुक पेजवर सर्वांना साधता येणार असुन जनतेने त्यांचे प्रश्न, असलेल्या शंका सर्व संबंधित अधिकाऱ्यांना विचारुन निरसन करुन घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
-*-*-*-*-*-


No comments:

Post a Comment