Wednesday 6 September 2023

जिल्ह्यात दूध भेसळखोरांविरोधात धडक मोहिम

 


 


 

जालना, दि. 6 (जिमाका) - राज्यात दुधात मोठया प्रमाणात भेसळ होते. सदर भेसळीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त दर मिळत नाही. तसेच दूध भेसळीमुळे जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जनतेला स्वच्छ व गुणवत्तापुर्ण दुधाचा पुरवठा होण्याच्या अनुषंगाने दुध व दुधजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली. त्याअनुषंगाने जालना जिल्हामध्ये दुध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभाग/ अन्न व औषध प्रशासन / वैद्यमापनशास्त्र विभागाने कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे.

या बाबत शासन निर्णयानुसार जिल्हयात पथक तैनात करून दूध भेसळखोरांना अटकाव करण्यासाठी कडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे दूध भेसळ रोखण्यासाठी अक्शन मोडवर कार्यवाई केली जाणार आहे.

राज्यात दुधात होणाऱ्या भेसळीबाबत सातत्याने तक्रारी आणि निवेदने मंत्रालय स्तरावर प्राप्त होत आहेत. मध्यंतरी विविध जिल्हयातील दूध भेसळ रोखण्यासाठी धडक मोहिम राबविण्याबाबत सचिव (पदुम) तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी दुग्धव्यवसाय विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये त्यांनी भेसळखोरांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

दूध भेसळ नियंत्रणासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीने जिल्हावार धडक मोहीम घेण्याबाबतच्या सूचना श्री. मुंढे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जालना जिल्हयात दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या भेसळीबाबत धडक मोहीम राबविण्याच्या दृष्टीने समिती अध्यक्ष यांनी तात्काळ कार्यवाही करावी, असे बैठकीत  निर्देश दिलेले आहेत: त्याअनुषंगाने जालना जिल्हयातील दूध व दुग्धजन्य पदार्थांची २० ठिकाणची तपासणी करण्यात येऊन एकुण १०८ नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. धडक मोहीम राबविण्याच्या दृष्टीने जिल्हयातील मोठे दुध प्रकल्प गावातील दुध संकलन केंद्र तसेच किरकोळ विक्रेते धारक इ. ठिकाणीही  प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्यात यावी, निर्देश अपर जिल्हाधिकारी तथा  जिल्हास्तरीय भेसळ समितीचे अध्यक्ष शशिकांत हदगल यांनी निर्देश दिलेले आहे.

दूध व दुग्धजन्य पदार्थ यांची भेसळ कोठे होत असेल तर यांची तक्रार जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना या कार्यालयास तक्रार नोंदवावी तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी तथा जिल्हास्तरीय भेसळ समितीचे सदस्य सचिव आर.बी. मते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment