Tuesday 5 September 2023

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक - ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

 



जालना, दि. 5  (जिमाका) : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक असून एक महिन्याच्या आत याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

          मराठा आरक्षणासाठी अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांची आज श्री. महाजन यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, पालकमंत्री अतुल सावे, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

          श्री. महाजन म्हणाले की, मराठा आरक्षण व समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची  बैठक काल मुंबईत पार पडली.  आरक्षणाबाबत नेमलेल्या समितीचा एका महिन्याच्या आत अहवाल प्राप्त होताच निर्णय घेण्यात येईल. मात्र त्याआधीच हे काम पूर्ण होऊन निर्णय घेण्यात येईल. सर्व बाजू तपासूनच निर्णय घेतला जाईल.  सरकार  आरक्षणाबाबत अतिशय सकारात्मक आहे. उपोषणकर्ते श्री. जरांगे यांनी तब्येतची काळजी घ्यावी. आरक्षणाबाबतच्या प्रक्रीयेस शासन सर्वोच्च प्राधान्य देत आहे. कमी कालावधीत निर्णय घेण्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

***

 

 

No comments:

Post a Comment