Tuesday 26 September 2023

ग्राहकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील - जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 




जालना, दि. 26 (जिमाका) – ग्राहकांसाठी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत ज्या ज्या सेवा येतात, त्या ग्राहकांना निश्चितपणे दिल्या जातील. तसेच ग्राहकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या  समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील, अशी ग्वाही  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक दि. 25 सप्टेंबर रोजी पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, पोलीस, आरोग्य, वैधमापन शास्त्र, परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसह शासकीय सदस्य नंदकुमार देशपांडे, शालिणी पुराणिक, बाबासाहेब सोनटक्के, संजय देशपांडे, रमेश तारंगे, बालाप्रसाद जेथलिया, मधुकर सोनोने, संदिप काबरा, विजय जाधव, सतिश पंच, डॉ. स्वप्निल मंत्री, अनिल मुंदडा, जुमानबिन नासेर चाऊस आदी उपस्थित होते.

            प्रारंभी सदस्यांनी ग्राहकांच्या विविध समस्या मांडल्या.  वीजेची लोडशेडींग थांबवावी, अन्नपदार्थात होणारी भेसळ रोखावी, शहरातील मोकाट जनावरांचा सुळसुळाट रोखावा,  बोगस डॉक्टरांवर कारवाई करणे, खाजगी दवाखान्यात एकसमान दर आकारणी, बीएसएनलने अखंडित सेवा पुरवणे, शेतकऱ्यांना विनाअडथळा सेवा पुरविण्याबाबत कार्यवाही करण्यास सांगितले.

            जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सुविधा मिळण्यासाठी  संबंधित विभागाचे अधिकारी व ग्राहक संरक्षण परिषदेचे  सदस्य मिळून सकारात्मकपणे जबाबदारी पार पाडुयात. ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन योग्य ती दक्षता घेईल.  वीजेचा लोडशेडींगचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.  शहरातील मोकाट जनावरांचा सुळसुळाट रोखण्याबाबत मनपा आयुक्तांना सुचित करण्यात आले असून कोंडवाड्यासाठी यंदा जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद केली जाईल.

दरम्यान, वजन-मापे तपासणी, अन्नपदार्थातील भेसळ रोखण्यासाठी तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. ग्राहकांच्या समाधानासाठी सदस्यांनी ग्राहकांच्या समस्या प्राधान्याने मांडाव्यात. असेही त्यांनी सुचित केले.

***

No comments:

Post a Comment