Monday 11 September 2023

भाडे तत्वावरील इमारतींमध्ये सखी निवास कार्यान्वित करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत

 


जालना, दि. 11 (जिमाका) :-  नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या शहरामध्ये सुरक्षित आणि सोईस्कर निवासाची व्यवस्था होण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातुन भाडे तत्वावरील इमारतींमध्ये सखी निवास कार्यान्वित करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. यासाठी प्रस्तावांची संख्या अत्यल्प असल्यामुळे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव बुधवार दि.20 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती चिमंद्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

 

 

राज्यातील नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या शहरामध्ये सुरक्षित आणि सोईस्कर निवासाची व्यवस्था होण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातुन भाडे तत्वावरील इमारतींमध्ये सखी निवास कार्यान्वित करण्यासाठी महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत दि.3 जुन 2023 रोजी जाहीरात देऊन प्रस्ताव मागविण्यात आले होते. तथापि, जिल्ह्यांतील इच्छुक संस्था, एजन्सी यांच्याकडुन प्राप्त होणाऱ्या सखी निवास प्रस्तावांची संख्या अत्यल्प असल्यामुळे सदर योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार पात्र असलेल्या संस्था/एजन्सी मार्फत पुनःश्च प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. तरी प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक असलेली सविस्तर माहिती, अर्जाचा नमुना, संस्था, एजन्सीच्या पात्रतेच्या निकषांची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, तळ मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे.

नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित आणि सोयीस्कर पध्दतीने निवासाच्या व्यवस्थेकरिता केंद्र शासनाच्या दि.14 जुलै 2022 रोजीच्या मार्गदर्शक सुचनेनूसार मिशन शक्ती अंतर्गत संबल आणि सामर्थ्य या दोन योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेतील सामर्थ्य या उपयोजनेत नोकरी करणाऱ्या महिलांकरीता सखी निवास या घटक योजनेचा समावेश आहे. राज्यात सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहांव्यतिरिक्त आणखी नवीन 50 सखी निवास कार्यान्वित करावयाची आहेत.  इच्छुक संस्था, एजन्सी यांनी विहित नमुन्यात व विहित मुदतीत प्रस्ताव एकुण 5 प्रतीत  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जालना येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, तळ मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे संपर्क साधावा. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment