Tuesday 26 September 2023

जिल्हा क्रीडा संकुलचा होणार कायापालट

 


 

जालना, दि. 26 (जिमाका) :- जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलचा लवकरच कायापालट होणार असून अत्याधुनिक क्रीडा सुविधांनी हे संकुल सज्ज होणार आहे. टेनिस कोर्ट, सिंथेटिक बॉस्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल मैदान, कबड्डी मैदान,  खो-खो मैदान, सिंथेटिक स्केटिंग रिंग, आर्टीफिशियल क्रिकेट टर्फ, जिम हॉल, 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, नॅचरल फुटबॉल मैदान, जलतरण तलाव  या सारख्या क्रीडा सुविधा  अत्याधुनिक स्वरुपात खेळाडुंसाठी क्रीडा संकुलात उपलब्ध होणार आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली दि. 25 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा क्रीडा संकुलाचे रुप बदलण्यासाठी विविध विषयांवर चर्चा झाली. बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्यासह जिल्हा परिषद, बांधकाम, पोलीस, शिक्षण, महावितरण विभागांचे अधिकारी व वास्तुविशारदांची उपस्थित होती.

जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडुंसाठी विविध सुविधा उपलब्ध करण्याकरीता सध्या फेज-1 अंतर्गत कामे सुरु आहेत. यामध्ये अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, टेनिस कोर्ट, सिंथेटिक बॉस्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल मैदान, कबड्डी मैदान,  खो-खो मैदान, सिंथेटिक स्केटिंग रिंग, आर्टीफिशियल क्रिकेट टर्फ, जिम हॉल आदी कामांना सुरुवात झाली आहे. व्यायामशाळा हॉलची दुरुस्ती व रंगरगोटीचे काम प्रगतीपथावर आहे. 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, नॅचरल फुटबॉल मैदान, हॉफ  ऑलंम्पीक साईजचा जलतरण तलाव, सिंथेटिक ॲथलेंटिक पॅव्हेलियन बिल्डींग, आर्चरीज रेंज, स्टोअर रुम या कामांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सर्व कामे गुणवत्तापूर्ण  करण्यात यावीत. कुठल्याही कामांमध्ये तडजोड करु नये. कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

दरम्यान, बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी जिल्हा क्रीडा संकुलला भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली व संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.

***

No comments:

Post a Comment