Tuesday 12 September 2023

जिल्हा परिषदेकडून केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनेच्या पुरस्कारासाठी ग्रामपंचायत, सर्कल व तालुक्यांची निवड जाहीर

 

जिल्हास्तरीय अमृत महाआवास अभियान 2022-23 अंतर्गत बैठक‍ संपन्न


 

जालना, दि. 12 (जिमाका) :-  अमृत महाआवास अभियान 2022-23 अंतर्गत दि.20 नोव्हेंबर 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करण्यात आले असून या मुल्यमापनाच्या आधारे उत्कृष्ट कामासाठीच्या पुरस्कारासाठी ग्रामपंचायत, सर्कल व तालुकास्तरावर नामांकनांची जिल्हास्तरावर निवड जाहीर करण्यात आली. जिल्हास्तरीय अमृत महाआवास अभियान 2022-23 पुरस्काराची निवड करण्याबाबत जिल्हास्तरीय सनियंत्रण व मुल्यमापन समितीची बैठक दि.12 सप्टेंबर 2023 रोजी जालना जिल्हा परिषदेत पार पडली. यावेळी अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक शिरीष बनसोडे यांच्यासह समिती सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वांसाठी घरे-2024 या शासनाच्या धोरणाअंतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना,शबरी आवास योजना व पारधी आवास योजना या स र्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता आणणे हा अभियानाचा हेतू आहे.

सर्वोकृष्ट ग्रामपंचायत प्रधानमंत्री आवास योजना तालुकास्तरीय पुरस्कारात जाफ्राबाद तालुक्यातील घानखेडा तर परतुर तालुक्यातील आकोली व आंगलगाव ग्रामपंचायतीची अनुक्रमे निवड करण्यात आली. तर सर्वोकृष्ट जिल्हा परिषद सर्कल पुरस्कारात परतूर तालुक्यातील वाहेगाव सातारा, जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी तर अंबड तालुक्यातील जामखेड या सर्कलची अनुक्रमे निवड करण्यात आली. तसेच सर्वोकृष्ट तालुके म्हणून अंबड, बदनापूर आणि जालना अशी तालुक्यांची अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने निवड करण्यात आली.

सर्वोकृष्ट ग्रामपंचायत राज्यपुरुस्कृत आवास योजना तालुकास्तरीय पुरस्कारासाठी जाफ्राबाद तालुक्यातील हिवराबली व निमखेडा बु. आणि जालना तालुक्यातील दरेगाव या ग्रामपंचायतीची अनुक्रमे निवड करण्यात आली. सर्वोकृष्ट जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत पुरस्कारात परतूर तालुक्यातील फुलवाडी, जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी आणि भोकरदन तालुक्यातील नळनी बुद्रुक या सर्कलची अनुक्रमे निवड करण्यात आली. तसेच सर्वोकृष्ट तालुके म्हणून अंबड, घनसावंगी आणि जालना अशी तालुक्यांची अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने निवड करण्यात आली.

राज्यात ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे. ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये शासकीय यंत्रणा व पंचायतराज संस्था यांच्याबरोबरच समाजातील सर्व घटक यात स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, खासगी संस्था, तंत्र शिक्षण संस्था, बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थ आदि भागधारकांचा सक्रीय सहभाग वाढविणे. राज्यात ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील भागधारकांची क्षमता बांधणी व जन-जागृतीद्वारे लोक चळवळ उभी करणे.  ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा कृतीसंगम घडवून आणणे. ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविणे हाच अमृत महा आवास अभियान 2022-23  राबविण्याचा उद्देश आहे. या बैठकीच्या यशस्वीतेसाठी  कार्यालयीन अधिक्षक भाऊसाहेब हरकळ, जिल्हा कार्यक्रमाधिकारी सय्यद मिनाज, लेखाधिकारी इकबाल सिध्दीकी आणि व्ही.टी. वाघ आदिंनी परिश्रम घेतले.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment