Wednesday 27 May 2020

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बि-बियाणे, खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्या पीककर्जाचे उद्दिष्ट पुर्ण न करणाऱ्या तसेच कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करा -कृषिमंत्री दादाजी भुसे


जालना दि. 27 (जिमाका):- शासनाने यंदाचे वर्ष हे उत्पादकता वाढ वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यादृष्टीने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेऊन उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करावेत.  तसेच पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये असमर्थ ठरणाऱ्या, पीककर्ज वाटपामध्ये टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश कृषि व माजी सैनिककल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये विभागीय खरीप हंगाम 2020 आढावा बैठकीचे सामाजिक अंतराचे पालन करत आयोजन करण्यात आले होते. 
            यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, फलोत्पादन व रोहयो मंत्री संदीपान भुमरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, औरंगाबादचे विभागीय कृषि सहसंचालक डी.एल. जाधव, लातुर विभागाचे डी.एन जगताप, जालन्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपसंचालक विजय माईनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            कृषिमंत्री श्री भुसे म्हणाले,  शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी पीककर्जाची निकड असते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी मागणी केल्यास त्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करुन द्यावे. शेतकऱ्यांकडे असलेल्या थकबाकीचा विचार न करता, पीक कर्ज द्यावे. शेतकऱ्यांनी पीककर्जाची मागणी करुनही त्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अथवा पीककर्जाचे प्राप्त उद्दिष्ट पुर्ण न करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देत पीक कर्ज वितरणासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन पीककर्जापासुन शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
            पीकउत्पादन वाढून शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर शासन भर देत असल्याचे सांगत खरीप हंगामामध्ये बि-बियाणे, रासायनिक खते यांचा मुबलक प्रमाणात पुरवठा करण्यात आला आहे.  बि-बियाणे तसेच रासायनिक खतांची कमतरता भासणार नाही, याबाबतचे कृषि विभागामार्फत सुक्ष्म असे नियोजन करण्यात आले असुन खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे रास्त भावात उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देत जालना जिल्हा उत्पादकतेमध्ये अग्रेसर असल्याबद्दल जिल्ह्याचे अभिनंदन करुन मराठवाड्यातील इतर जिल्ह्यानीही जालना जिल्ह्याच्या धर्तीवर उपक्रम राबवुन उत्पादकता कशी वाढेल याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले.
            युरियाचा ५० हजार मेट्रिक टन साठा राज्यात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना युरीया कमी पडणार नाही मात्र जमिनीचा पोत चांगला रहावा, यासाठी शेतकऱ्यांनी युरियाचा वापर हा कमीत कमी वा आवश्यक तितकाच करावा, यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून घरचे बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. तथापि,याबाबत सुक्ष्म नियोजन करुन शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही कृषि मंत्री श्री भुसे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
            लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असल्याचे सांगत विदर्भ, मराठवाड्यातील संत्री संपुर्ण महाराष्ट्रभर पोहोचविण्यात आली.कोकणातला आंबा, नाशिक व इतर ठिकाणाहुन पीकविण्यात येणारे द्राक्षे पुणे, मुंबई यासारख्या ठिकाणी पोहोचवुन अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करण्यात आले असुन या कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामध्ये कृषी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांबरोबरच आपल्या कुटूंबाचीही काळजी घेण्याचे आवाहन कृषिमंत्र्यांनी यावेळी केले.
            राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. मराठवाड्यात पीककर्ज वाटपामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांचे काम समाधानकारक नसल्याची खंत व्यक्त करत राष्ट्रीयकृत बँकांसुद्धा पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पुर्ण करत नसल्याचे सांगुन मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नामध्ये लक्ष घालावे. पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पुर्ण न करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच पीककर्ज वाटप हे जुनअखेरपर्यंत पुर्ण करण्याच्या सुचना देत जालना जिल्ह्यामध्ये कृषि विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत.  ही पदे तातडीने भरण्याची मागणीही कृषिमंत्र्यांकडे यावेळी पालकमंत्री श्री टोपे यांनी केली.
जालना जिल्हा उत्पादकतेमध्ये अग्रेसर
कृषिमंत्र्यांनी केले जालना जिल्ह्याचे कौतुक
       मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जालना जिल्हा उत्पादकतेमध्ये अग्रेसर असल्याने जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक करत कृषिमंत्री श्री भुसे यांनी अभिनंदन केले व इतर जिल्ह्यांनीही जालना जिल्ह्याच्या धर्तीवर उपक्रम राबवुन उत्पादकता कशी वाढेल याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले.   सन 2018 मध्ये कापुस पीकाची उत्पादकता ही 217 किलोप्रतिहेक्टर होती ती सन 2019 मध्ये 480.65 किलोप्रतिहेक्टर झाली आहे.  सोयाबीन895 किलोप्रतिहेक्टर होती सन 2019 मध्ये 1726.61, मका-1923 सन 2019 मध्ये 2578.06, तुर-472 सन 2019 मध्ये 1477.91, मुग-255 सन 2019मध्ये 629.63 तर उडिदाची सन 2018 मध्ये 323 किलोप्रतिहेक्टर एवढी उत्पादकता होती आणि सन 2019 मध्ये ती वाढुन 829.97 किलो प्रतिहेक्टर एवढी झाली आहे.

            यावेळी महाराष्ट्र फटीलायजर डिलर्स असोशिएशन, पुणे यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लक्ष रुपयांचा धनादेश कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे सुपूर्द केला.  यावेळी असोशिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ करळे, सचिव प्रकाश मुथा, अतुल लड्डा आदींची उपस्थिती होती.
            बैठकीस मराठवाड्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सर्व जिल्हा उपनिबंधक, सर्व लिडबँकांच्या व्यवस्थापकांची उपस्थिती होती.
*******    



No comments:

Post a Comment