Tuesday 26 May 2020

नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन करण्याबाबत जनमानसामध्ये जनजागृती करा -- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे


जालना, दि. 26 -  जालना जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत नागरिकांचे जनजीवन सुरळीत सुरु झाले असुन प्रत्येक नागरिकाने सामाजिक अंतराचे पालन करावे यासाठी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.
            यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम.के. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, संपर्क अधिकारी डॉ. संतोष कडले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सहवासितांची माहिती तातडीने घ्यावी.  तसेच हायरिस्क सहवासितांना कोव्हीडकेअर सेंटरमध्ये दाखल करावे.  एखाद्या ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यास उप विभागीय अधिकारी यांनी तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावा.  तसेच प्रतिबंधित क्षेत्रातुन अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही फिरणार नाही. त्याचबरोबरच एखाद्या रुग्णालयात संशयीत कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास ते रुग्णालय बंद न करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
*******

No comments:

Post a Comment