Friday 22 May 2020

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या 860 नागरिकांना घेऊन विशेष रेल्वे बिहारकडे रवाना


जालना, दि. 22 (जिमाका) :- लॉकडाऊनमुळे जालना जिल्ह्यात अडकुन पडलेल्या परराज्यातील नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सोय करण्यात येत असुन यापूर्वी दोन विशेष श्रमिक रेल्वेच्या माध्यमातुन  उत्तरप्रदेशमधील उन्नाव येथील नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले आहे.  आज दि. 22 मे रोजी 1400 नागरिकांना घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या सुरु झाल्याने बऱ्याचशा बिहारी नागरिकांनी या कंपनीमध्ये स्वत:हुन थांबणे पसंत केल्याने प्रवासासाठी आलेल्या 860 एवढ्या नागरिकांना घेऊन विशेष रेल्वे बिहारकडे रवाना झाली आहे. 
            लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत अत्यंत शिस्तबद्धरितीने नियोजन करण्यात येत असुन या कामामध्ये जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्था प्रशासनाला मदत करत असुन दि. 22 मे रोजीच्या विशेष रेल्‍वेसाठीही जिल्‍हा प्रशासनाने अत्यंत चोख असे नियोजन केले होते.  बिहार राज्यामध्ये येण्यासाठी बिहार सरकारकडून लेखी  परवानगी प्राप्‍त करुन घेत कामगारांच्या प्रवासाची तिकिटे आरक्षित करण्यात आली.  शासनाच्या निर्णयानुसार या सर्व नागरिकांच्या प्रवासासाठी लागणाऱ्या तिकीटाचे पैसे प्रशासनामार्फत अदा करण्यात आले. जालना शहरामधून जाणाऱ्या नागरिकांना व जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अडकुन पडलेल्या या मजुरांना  जालना रेल्वेस्टेशनपर्यंत आणण्यासाठी प्रशासनामार्फत विशेष बसची सोयही करण्यात आली होती. प्रवास करणा-या मजुरांची सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातुन रेल्वे स्थानकावर आरोग्य तपासणीही करण्यात आली. प्रवाशांसाठी चालविण्यात येणा-या  या रेल्वेचे  पुर्णपणे ‍निर्जंतुकीकरण करण्यात येवून प्रवास करणा-या प्रत्येकाने चेह-यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करुन घेण्यात आली. रेल्वेमधुन पाठविण्यात येणा-या प्रवाशांना सोशल डिस्टसिंग बंधनकारक करण्यात आले होते. तसेच विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करुन  त्यांच्यासोबत खाद्य पदार्थही देण्यात आले.
                यावेळी नायब तहसिलदार श्री सोनवणे, बालकामगार प्रकल्प अधिकारी मनोज देशमुख, पोलीस निरीक्षक   श्री महाजन यांच्यासह महसुल,  रेल्वे, पोलीस, आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment