Tuesday 20 June 2023

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना गोशाळांना अर्ज करण्याचे आवाहन

जालना, दि.20 (जिमाका) :- सन 2023 -24 राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सुरु असलेली गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही नवीन सुधारीत योजना राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील पात्र व इच्छुक संस्थानी अर्ज बुधवार दि. 19 जुलै 2023 पर्यंत अर्ज जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात सादर करावेत. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जालना यांनी केले आहे. योजनेचा मूलभूत उद्देश - दुग्धोत्पादनास, शेती कामास, पशु पैदासीस, ओझे वाहण्याच्या कामास उपयुक्त नसलेल्या/ असलेल्या गाय, वळू, बैल व वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करणे. अशा पशुधनासाठी चारापाणी व निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देणे. गोवर्धन गोवंश सेवा केंद्रामधील पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणीसाठी वैरण उत्पादन कार्यक्रम राबविणे. गोमूत्र शेण इत्यादीपासून विविध उत्पादने खत गोबर गॅस व इतर उपपदार्थाच्या निर्मितीस प्रोत्साहन/ चालना देणे असा आहे. लाभार्थी निवडीचे निकष, अटी व शर्ती - सदरची संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असावी. सदर संस्थेकडे नजीकच्या मागील तीन वर्षाचे लेखापरीक्षण झालेले असणे आवश्यक आहे. संस्थेस गोवंश संगोपनाचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असावा. केंद्रावर असलेल्या पशुधनास आवश्यक असलेले वैरण /चारा उत्पादनासाठी तसेच पशुधन संगोपनासाठी संस्थेकडे स्वतःच्या मालकीची अथवा 30 वर्षाच्या नोंदणीकृत भाडेपट्ट्यावरील किमान 5 एकर जमीन असावी. संस्थेने या योजनेअंतर्गत मागणी केलेल्या एकूण अनुदानाच्या कमीत कमी 10 टक्के एवढे खेळते भाग भांडवल संस्थेकडे असणे आवश्यक आहे. संस्थेत गोसेवा/ गोपालनाचे कार्य करण्यासाठी आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासोबत करारनामा करण्याचे बंधनकारक राहील. संबंधित संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे. संस्थेवर कार्यरत कर्मचारी /मजूर यांचे वेतन इत्यादीचा खर्च संस्थेकडून अदा करण्यासाठी संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम असावी. या योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल त्याच बाबीसाठी भविष्यात नव्याने कोणतेही अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार नाही. ज्या संस्थाकडे पशुधनाच्या देखभालीसाठी व चाऱ्यासाठी स्वतःच्या उत्पन्नाचे साधन आहे अशा संस्थांना प्राधान्य देण्यात येईल. प्रशासकीय विभागाची पूर्वपरवानगी घेऊन केवळ मूलभूत सुविधा निर्माण करण्याकरिताच अनुदान देय राहील. प्रशासकीय विभागाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मूलभूत सुविधा निर्माण केल्यास अशा बाबींसाठी या योजनेत अनुदान मंजूर करण्यात येणार नाही. गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत लाभार्थी गोशाळांच्या निवडीसाठी वेळापत्रकानूसार पात्र संस्थान कडून अर्ज स्विकारणे दि. 19 जून ते 19 जुलै 2023, जिल्हास्तरावर छाननी करणे दि. 31 जुलै 2023 अखेर, जिल्हास्तरावरून प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन यांचेकडे प्रस्ताव सादर करणे दि. 1 ऑगस्ट 2023, प्रादेशिक पशुसंवर्धन आयुक्त यांच्या स्तरावर छाननी करणे दि. 1 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2023, प्रादेशिक पशुसंवर्धन आयुक्त यांचेकडून आयुक्त पशुसंवर्धन कार्यालयास सादर करणे दि. 21 ऑगस्ट 2023, आयुक्त पशुसंवर्धन कार्यालय स्तरावर छाननी करणे दि. 22 ऑगस्ट ते20 सप्टेंबर 2023, प्रस्ताव शासनास सादर करणे दि. 21 सप्टेंबर 2023 अशी मुदत देण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

No comments:

Post a Comment