Friday 16 June 2023

महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये जमावास प्रतिबंध

जालना, दि.16 (जिमाका) :- जिल्ह्यात दि.29 जुन 2023 रोजी मु‍स्लिम बांधवांच्या बकरी ईद उत्सव तसेच हिंदु धर्मियांचा आषाढी एकादशी, आनंदस्वामी यात्रा व दि.3 जुलै रोजी गुरुपौर्णिमा असल्याने जालना जिल्ह्यात व शहरात सण साजरे होणार आहेत. विविध कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये दि.19 जुन ते 3 जुलै 2023 रोजीपर्यंत जमावास प्रतिबंध करण्यात आला आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी जारी केले आहेत. सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द विविध कारणावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहे. तसेच मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी व शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये अधिकाराचा वापर करुन याद्वारे पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आले आहे. हा आदेश अधिकारी-कर्मचारी यांना लागू होणार नाही. तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक व जालना, अंबड, परतुर, भोकरदन उपविभागातील पोलीस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू असणार नाही. हा आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी दि.19 जुन 2023 रोजीचे 6 वाजेपासून ते दि. 3 जुलै रोजीचे 24 वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. -*-*-*-*-

No comments:

Post a Comment