Friday 23 June 2023

शेती शाळा कार्यक्रम संपन्न

जालना, दि. 23 (जिमाका) :- कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माअंतर्गत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प हा जालना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मूल्य साखळी विकास शाळा हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याला शेती शाळाची जोड देण्यात आली आहे. जालना तालुक्यातील पाचन वडगाव येथे शेती शाळा घेण्यात आली. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. राहुल चौधरी, आत्माचे सहायक तंत्र व्यवस्थापक दत्तात्रय सूर्यवंशी, अर्जुन मद्दलवार यांची उपस्थिती होती. सध्या चालू असलेल्या खरीप हंगामाबद्दल, एका पिकाबद्दल शेतकऱ्याला सर्वंकष माहिती कृषि विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ डॉ. चौधरी यांनी दिली. सोयाबीन पीक काढणीपर्यंतच्या कालावधीत 6 दिवस या शाळा भरतात. या शाळेत किमान 30 शेतकरी असतात. ज्या पिकाची शेतीशाळा असेल त्या पिकाच्या नवीन तंत्रज्ञानानुसार प्लॉट घेतला जातो. माती तपासणीपासून ते पीक काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान त्याला पुरविले जाते. नवीन जातीचे बियाणे, लागवड पद्धत, अन्नघटक व मूलद्रव्यांची कमतरता, पाणी कधी द्यायचे, पिकाच्या पानांवर दिसणारी लक्षणे, खुणा त्या ओळखायच्या कशा व त्यावर काय उपाययोजना करण्यापासून ते प्रत्यक्ष पीक काढणीपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन ‘आत्मा’च्या स्मार्ट प्रकल्पातून करण्यात येणार आहे. जमिनीनूसार पिकांची लागवड, बियाणे निवड , बियाणे उगवण क्षमता, बीज प्रक्रिया, जमिनीनूसार रोपांचे व दोन ओळीचे अंतर कसे आणि किती ठेवावे यावर सविस्तर मार्गदर्शन डॉ. चौधरी यांनी केले. या कार्यक्रमास बिजांकुर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संतोष काकडे यांच्यासह शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्जुन मद्दलवार यांनी केले. असे कृषी विभागाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

No comments:

Post a Comment