Tuesday 27 June 2023

आषाढी एकादशीनिमित्त 29 जून रोजी जालना शहरातील वाहतूकीच्या मार्गात बदल

जालना दि. 27 (जिमाका) :- जालना शहरात आषाढी एकादशीनिमित्त गुरुवार दि.29 जुन 2023 रोजी प्रति वर्षाप्रमाणे श्री आनंदीस्वामी महाराज पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जालना शहरात मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येण्याची शक्यता असल्याने गर्दी राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 ची कलम 36 अन्वये शक्तीचा वापर करुन वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी व वाहतूकीची कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जालना शहरातील वाहनांच्या वाहतूकीच्या मार्गात अंशत: बदल करण्यात आला आहे. असे आदेश पोलिस अधिक्षक तुषार दोशी यांनी जारी केले आहेत. आदेशानूसार गांधी चमनकडून शनि मंदिराकडे येणारी वाहतुक एस.बी. शाळेच्या पाठीमागुन घायाळ नगरमार्गे अमृतेश्वर मंदीर जवळुन नुतन वसाहत ते अंबड चौफुलीकडे जातील. मोतीबाग चौकाकडुन शनिमंदीरकडे येणारी वाहतुक ही मुक्तेश्वरद्वार जवळुन पाठक मंगल कार्यालय ते भाग्यनगर मार्गे रेल्वे स्टेशनकडे तसेच नुतन वसाहतीकडे जातील. लक्कड कोटकडुन विठ्ठल मंदिरमार्गे गांधी चमनकडे येणारी वाहतुक ही विठ्ठल मंदीर जवळील पेशवे चौकाजवळून मस्तगड मार्गे गांधी चमन ते रेल्वे स्थानकाकडे जातील. असा वाहतूक मार्गामध्ये बदल गुरुवार दि.29 जुन 2023 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते रात्रीचे 12 वाजेपर्यंत करण्यात आला आहे. तरी सर्व वाहन धारकांनी एक दिवसीय वाहतूकीच्या मार्गाचा वापर करुन सहकार्य करावे. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. -*-*-*-*-

No comments:

Post a Comment