Friday 16 June 2023

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

जालना, दि.16 (जिमाका) : शेतात राबताना शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीस शेतकरी बळी ठरतात किंवा त्यांना अपंगत्व येते. अशा प्रसंगी शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देता यावी यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत आपत्ती उद्भवल्यास शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत मदत दिली जाते. शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, अशा नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघातामुले शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तिस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास, त्यांच्या कुटुंबास योजनेतून आर्थिक सहाय्य दिले जाते. योजनेंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये सहाय्य दिले जाते. अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 2 लाख तसेच एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. योजनेंतर्गत अपघातांच्या बाबींमध्ये रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतूनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरुन पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे, चावण्यामुळे जखमी, मृत्यू अशा अपघातांचा समावेश आहे. जालना जिल्हयात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतंर्गत मागील वर्षी 38 लाभार्थ्यांना रुपये 76 लक्ष निधी वितरीत करण्यात आला आहे. योजनेच्या लाभासाठी अर्जासोबत सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गांव नमुना नं. 6 क नुसार मंजूर झालेल्या वारसाची नोंद, वारसदाराचे ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, निवडणुक ओळखपत्र, अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला तसेच प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक. अपघात घडल्यानंतर कागदपत्रांसह प्रस्ताव संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागेल. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा. ***

No comments:

Post a Comment