Wednesday 7 June 2023

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जिल्ह्यातील निवासी शाळांचा निकाल शंभर टक्के

 


 

            जालना, दि.7 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत जालना समाज कल्याण या कार्यालयाच्या अधिनस्त जालना जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी मुला- मुलींच्या तीन शासकीय निवासी शाळा कार्यरत आहेत. वर्ष-2023 चा इयत्ता दहावीचा निकाल दि.2 जुन 2023 रोजी घोषित झाला असून तीनही शाळेच्या निकालाची उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 100 टक्के आहे,  अशी  माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भोकरदन येथील शासकीय निवासी शाळेचा निकाल 100 टक्के लागला असुन या शाळेतील आदित्य कैलास साळवे या विद्यार्थ्यांने 92.60 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक, गजानन परमेश्वर लवटे 90.60 टक्के गुण घेवून द्वितीय क्रमांक तर प्रशिक राम झिने 88.60 टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. बदनापूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेतील विजय गणेश खरात या विद्यार्थ्याने 91.40 टक्के गुण घेवून प्रथम क्रमांक, चंद्रमणी बबन तुपसमुद्रे याने द्वितीय क्रमांक तर शुभम सुभाष खरात 84.40 टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.

भोकरदन येथील अनु. जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा कु. सारिका परमेश्वर घोगरे 84.20 टक्के गुण घेवून प्रथम क्रमांक, कु.साक्षी विजय गाडेकर 81.80 टक्के गुण घेवून व्दितीय क्रमांक तर कु.पल्लवी नवनाथ तुपे 78.40 टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

सामाजिक न्याय विभागातर्गंत जालना जिल्हयातील सर्व मुलां-मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील उत्तीर्ण विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक, सहशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे,  समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे,  आणि सहाय्यक आयुक्त दत्तात्रय वाघ यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment