Monday 5 June 2023

मुस्लिम उंटवाले व वायंदेशी कुणबी जात समूहाची सह्रदयतेने केली चौकशी व क्षेत्र पाहणी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांचा जालना जिल्हा दौरा संपन्न

 







       जालना, दि.5 (जिमाका) :-  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ.गोविंद  काळे आणि प्रा.डॉ.निलिमा सरप (लखाडे) यांनी आज जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील रवणा, परंडा,परतूर तालुक्यातील वैजोडा आणि जाफ्राबाद तालुक्यातील भातोडी या गावास प्रत्यक्ष भेट देऊन तेथे वास्तव्यास असलेल्या मुस्लिम उंटवाले व वायंदेशी कुणबी जात समुहाच्या लोकांशी सह्रदयतेने संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत  क्षेत्र पाहणी केली.

    यावेळी  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग आयोगाचे संशोधन अधिकारी मेघराज भाटे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय वाघ, संबंधित तालुक्याचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

       प्रा.डॉ.गोविंद  काळे आणि प्रा.डॉ.निलिमा सरप (लखाडे) हे सदस्य आज जालना जिल्हा दौऱ्यावर आले. त्यांनी जिल्ह्यातील रवणा,परांडा, वैजोडा आणि भातोडी या गावात वास्तव्य करीत असलेल्या मुस्लिम उंटवाले व वायंदेशी कुणबी  या जात समूहातील व्यक्तींना त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांची सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक परिस्थिती जाणून घेतली. तसेच त्यांची जीवनशैली, राहणीमान, घराची स्थिती, रोजगार, व्यवसाय आणि संस्कृतीची निरीक्षणे नोंदविली.

      यावेळी त्यांनी या दोन जात समूहाच्या प्रतिनिधी, व्यक्तींशी चर्चा करत त्यांना स्थलांतरीत झाले असल्याचे सबळ पुरावे, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आदी कागदपत्रे जोडून राज्य मागासवर्ग आयोगाकडून तयार करण्यात आलेल्या 'कुटुंबासाठी मुलाखत अनुसूची' या विहित नमुन्यात ग्रामसेवक व तलाठी यांच्याकडे सादर करावेत, अशी सूचना करुन  संबंधित गावातील तलाठी व ग्रामसेवक यांनी सदरील अर्जाचे प्रामाणिकरण करून घेतलेले अर्ज तहसीलदार यांच्याकडे जमा करावेत. संबंधित तहसीलदारांनी सदरील अर्ज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयात 15 दिवसांच्या आत जमा करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. जेवढी माहिती अचूक व पुराव्यानिशी दिली जाईल ती माहिती आयोगाकडून अहवालाद्वारे अधिवेशनात सादर करण्यात येऊन पात्र संबंधितांना या प्रवर्गाचा लाभ मिळवून दिला जाईल,  अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

         जिल्ह्यातील दौऱ्यात सदस्यांनी रवणा या गावातील मच्छिंद्र माने, नीता सुरेश माने, जालिंदर माने, रामेश्वर माने, ऋषिकेश तुकाराम माने, प्रयागबाई दत्तू शेळके यांच्या घरी प्रत्यक्ष भेट दिली तर  अमीर बशीर सय्यद यांच्यासह मुस्लिम उंटवाले  समुदायाच्या वस्तीवरील पालावर भेट देत ते सादर करत असलेल्या कसरती खेळांचे निरीक्षण केले. वैजोडा गावातील आसाराम मोहिते, शिवाजी भोसले तर भातोडी गावातील अशोक भोरे व अरुण भोरे यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यात संबंधित समुदायाचे व्यक्ती, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                                       -*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment