Monday 19 June 2023

महिला सन्मान बचतपत्र योजनेची खाते उघडण्यासाठी विशेष अभियान

जालना, दि.19 (जिमाका) :- महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि महिलांची आर्थिक गुंतवणूक वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने महिला सन्मान बचतपत्र योजना सुरु करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयामध्ये महिला सन्मान बचतपत्र योजनेची खाते उघडण्यासाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व वयोगटातील महिलांनी आपल्या आर्थिक प्रगतीस हातभार लावण्यासाठी पोस्ट ऑफीसमध्ये दि.30 जुन 2023 पर्यंत खाते उघडून विशेष अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. महिला सन्मान बचतपत्र ही योजना महिला आणि मुलींच्या आर्थिक प्रगतीसाठी आहे. एका मुलीच्या नावावर अथवा मुलीच्यावतीने तिच्या नावावर तिचे पालक बचतपत्र घेऊ शकतील. महिला सन्मान बचतपत्र योजनेत महिला 1 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. गुंतवणूक केल्यास 7.5 टक्के व्याज दर मिळेल. खाते उघडल्यापासून एका वर्षानंतर गरज पडल्यास 40 टक्के रक्कम केवळ एकदाच काढता येते. तर खात्याचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर खात्यातील रक्कम व्याजासहीत काढुन ते खाते बंद करता येण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विहीत नमुन्यातील अर्ज डाक कार्यालयात उपलब्ध असून महिला अर्जदारांसाठी आधारकार्ड, पॅनकार्ड आणि दोन छायाचित्रे तर मुलीसाठी मुलींचे आधारकार्ड, अपाक असल्यास पालकाचे पॅनकार्ड व पालकांचे दोन छायाचित्रे व रहिवासी पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रे आवश्यक असतील. असेही अधिक्षक डाकघर, परभणी विभाग परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

No comments:

Post a Comment