Thursday 22 June 2023

26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन; अंमली पदार्थांविरुध्द मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी -- अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे

जालना, दि. 22 (जिमाका) :- 26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे, यानिमित्त अंमली पदार्थांच्या विरोधात मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, अशी सूचना अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी केली. जिल्हा स्तरावर अंमली पदार्थांच्या वापरला आळा घालण्यासाठी तसेच क्षेत्रीय स्तरावरील अंमली पदार्थबाबतची समस्या प्रभावीपणी हातळण्यासाठी श्री. पिनाटे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डि.एन. रैतवार, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्त वर्षा महाजन, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी.आर.कापसे, टपाल विभागाचे अमोल स्वामी, शिक्षण विभागाच्या श्रीमती आर.ए. मालेवाड आदी उपस्थित होते. अंमली पदार्थांचे दुष्परिणाम अत्यंत घातक आहेत. जालना जिल्हयात कुठेही अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक, साठवणूक किंवा वापर होत असल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी तात्काळ याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला द्यावी, असे आवाहन करुन श्री. पिनाटे म्हणाले की, पोलीस प्रशासनाने अंमली पदार्थांच्या विरोधात कडक कार्यवाई करावी. कृषी विभागाने ग्रामीण भागात गांजा पिकाची लागवड केल्याचे आढळल्यास तात्काळ कार्यवाई करुन याची माहिती पोलीसांना द्यावी. टपाल किंवा कुरिअरच्या माध्यमातून अंमली पदार्थाची मागणी व पुरवठा होणार नाही, यासाठी डाक विभागाने विशेष लक्ष द्यावे. राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन, शिक्षण विभागाने देखील अंमली पदार्थांच्या विरोधासाठी आवश्यक ती कारवाई करावी. दि. 26 जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व शाळा व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत माहिती द्यावी, याबाबत शिक्षण विभागाने शाळांना सूचित करावे. याशिवाय अंमली पदार्थांविरोधात शपथ, पथनाटय असे उपक्रम राबवून अंमली पदार्थांच्या विरोधात जास्तीतजास्त जनजागृती करावी. ***

No comments:

Post a Comment