Friday 30 June 2023

पीएम प्रणाम योजना अंमलबजावणीसाठी दुरदृश्य प्रणालीद्वारे आढावा शेतकऱ्यांनी आरोग्य संपन्नतेसाठी सेंद्रीय शेतीकडे वाटचाल करावी - केंद्रीय मंत्री मनसुख मांडविय

 


    

 जालना दि. 30 (जिमाका) :- शेतजमिनीत रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी आणि मोठया प्रमाणात सेंद्रीय खतांचा वापर करुन मृदा समृध्द करण्याकरीता पीएम प्रणाम योजना केंद्र शासनाने कार्यान्वित केली आहे. जमीनीतील कस टिकून राहण्यासाठी आणि उत्पादनात वृध्दी होण्यासाठी पीएम प्रणाम योजना महत्वपूर्ण आहे. तरी देशातील शेतकऱ्यांनी जमिनीच्या आरोग्य संपन्नतेसाठी सेंद्रीय शेतीकडे वाटचाल करावी, असे आवाहन केंद्रीय खतं आणि रसायन मंत्री मनसुख मांडविय  यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दुरदृश्य प्रणालीद्वारे पीएम प्रणाम योजनेबाबत बैठक संपन्न झाली. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री एन.एस.तोमर, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह देशातील सर्व राज्याच्या कृषी मंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती होती.    

केंद्रीय मंत्री डॉ. मांडविय म्हणाले की, शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीसह सेंद्रीय खतांचा वापर करण्यावर अधिक भर द्यावा. पशुधनापासून मिळणाऱ्या टाकावू घटकांवर राज्यात बायोगॅस प्लँट तयार करावा यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडण्यास निश्चितच मदत होईल. असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय कृषी  मंत्री श्री.तोमर म्हणाले  की, कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढावी, शेतकऱ्यांना शेती करणे सोयीचे व्हावे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडावी, शेतीत तंत्रज्ञान वापरण्यात यावे यासह शेतातील मातीतील उत्पादकता टिकून रहावी यासाठी प्रधानमंत्री यांच्याकडून वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत आहेत. रासायनिक खतांचा कमी वापर करुनही उत्पादनात वाढ होवू शकते त्यामुळे नॅनो युरियाबाबतची माहिती शेतकऱ्यांनी माहिती करुन घेणे गरजेचे आहे. रासायनिक खते व औषधे आयातीवर अवलंबून न राहता आपल्याच मातीत आपण सेंद्रीय खते तयार करुन त्याचा शेतीमध्ये वापर वाढवून रसायनमुक्त शेती करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा. त्यातुन आपला स्वच्छ माती व स्वच्छ उत्पादन हा हेतू साध्य होईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी देशातील सर्व राज्यातील कृषी मंत्र्यांनी सांगितलेल्या सुचना विचारात घेण्यात येवून त्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही देण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख यांनी संगणकीय प्रणालीद्वारे देशातील सर्व कृषी मंत्र्यांना पीएम प्रणाम योजनेचा उद्देश स्पष्ट करुन सांगितला.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे आवाहन

बोगस खते व बियाणे विक्री करणाऱ्यांवर कृषी विभागाची करडी नजर असून विभागात बऱ्याच ठिकाणी बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या पावसाचा जोर कमी असल्याने पेरणीची घई करु नये.  यंदा पाऊस बऱ्यापैकी आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी वेळोवेळी कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे आवश्यक असून पेरणीची घाई न करता 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहनही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment