Friday 9 June 2023

शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणारे पानठेले दिसता कामा नये - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

जालना, दि.9 (जिमाका) :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील सर्व शाळात तंबाखूजन्य पदार्थां विरोधात वेळोवेळी जनजागृती करणे आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील सर्व शाळेच्या 100 मीटर परिसरात यलो मार्किंग करण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर सोपविण्यात यावी. सर्व शाळेच्या 100 मीटर परिसरात कुठल्याही प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारी पानठेले दिसता कामा नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समिती व जिल्हा सनियंत्रण समितीची बैठक आज पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पुरुषोत्तम नोगदरवाड, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, जिल्हा सल्लागार डॉ.संदीप गोरे यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, शाळेतील लहान मुले आपले आई-वडील व शिक्षकांचे अनुकरण करत असतात. आपल्या शिक्षकांकडून ते बऱ्याच गोष्टी शिकत व आत्मसात करत असतात. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी शिक्षकांची मुख तपासणी करून घ्यावी. असे सांगून शाळांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणारे पानठेले तात्काळ उचलण्यात यावे. तसेच शासकीय कार्यालय परिसरात तंबाखूचे सेवन करणाऱ्यावर कारवाई करून दंड वसूल करावा. तसेच तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना व्यसनातून मुक्त करावे. अशी सूचनाही त्यांनी केली. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा-2003 च्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी मुख आरोग्य तपासणी, समुपदेशन, व्यसनमुक्ती पेटी, गर्दीच्या ठिकाणी स्टॉल उभारून जनजागृती, प्रभात फेरी, भारुड, जाहिरात फलक, चित्रकला स्पर्धा, सेल्फी पॉईंट, फिरत्या वाहनातून श्राव्य संदेशाद्वारे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती करण्यात येत असते. वेळोवेळी सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करून दंड वसुली करण्यात येते. तसेच सर्व समावेशक उपचार आणि समुपदेशनाचा आधार घ्या व तंबाखूमुक्त जीवन जगा असा अमूल्य संदेशही प्रत्येक कार्यक्रमातून देण्यात येतो. तंबाखू मुक्तीसाठी 1800112356 आणि मुख स्वास्थासाठी 1800112032 हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा सल्लागार डॉ. संदीप गोरे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. बैठकीस शिक्षण, पोलीस, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य, विक्रीकर विभाग,जिल्हा कामगार अधिकारी आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. -*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment