Wednesday 14 June 2023

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी पात्र मागील चार वर्षाचे प्रलंबित अर्ज सादर करावेत

जालना, दि. 14 (जिमाका) :- जिल्ह्यात महाडिबीटी प्रणालीमार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असली तरी पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या विविध अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांचे विहित मुदतीत अर्ज भरता आले नाही. या बाबीचा विचार करता विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील सन 2018-19 ते 2021-22 मधील प्रवेशित ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारले गेले आहेत किंवा त्रुटी पुर्ततेसाठी प्रलंबित राहिले तसेच इतर कारणांनी प्रलंबित राहिले अशा सर्व विद्यार्थ्यांनी शनिवार दि. 24 जुन 2023 पर्यंत संबंधित महाविद्यालयांकडे ऑफलाईन स्वरुपात अर्ज सादर करावेत. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त दत्तात्रय वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. जिल्ह्यात महाडिबीटी प्रणालीमार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असली तरी पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या विविध अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांचे विहित मुदतीत अर्ज भरता न येणे, अर्ज नामंजूर होणे, एखाद्या वर्षी अर्ज भरता न आल्यास त्या वर्षी खंडीत वर्ष असे पोर्टलवर नमूद होऊन पुढच्या वर्षीचा अर्ज भरण्यास अडचण येणे, अशा बऱ्याच अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देता आला नाही. महाडिबीटी प्रणालीमध्ये आलेल्या सर्व अडचणींचा विचार करता, ज्या विद्यार्थ्यांना विविध अडचणी आल्या आहेत अशा विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन 2018-19 ते 2021-22 या कालावधीतील शिष्यवृत्ती, फ्रिशीप योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्याबाबत शासन निर्णय 24 मे 2023 अन्वये मंजुरी दिलेली असुन अटी व शर्तीच्या अधीन राहुन ऑफलाईन अर्ज करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ऑफलाईन अर्जाचा नमुना महाविद्यालयात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. संबंधित महाविद्यालयांनी समाज कल्याण कार्यालयांकडुन दिलेल्या सुचनानूसार अटी-शर्तीची पुर्तता करुन व पडताळणी करुन परिपुर्ण अर्ज समाज कल्याण कार्यालयात सादर करावेत. असे सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

No comments:

Post a Comment