Tuesday 20 June 2023

घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणारी रमाई आवास योजना

जालना, दि. 20 (जिमाका) : गरीब कुटुंब आपले स्वत:चे पक्के घर बांधू शकत नाही. अशा कुटुंबांना स्वत:चे हक्काचे घर उपलब्ध व्हावे यासाठी शासन घरकुलाच्या विविध योजना राबविते. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकासाठी राबविण्यात येत असलेली रमाई आवास ही एक अत्यंत महत्वाची योजना आहे. या योजनेने या घटकातील हजारो गरीब कुटुंबांना हक्काची पक्की घरे उपलब्ध करून दिली आहेत. अनुसूचित जाती व नवबौद्व घटकातील कुटूंबांचे राहणीमान उंचावणे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा यासाठी रमाई आवास योजना राज्यात राबविली जात आहे. ग्रामीण व शहरी भागामधील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घरांच्या जागेवर 269 चौरस फुटाचे पक्के घर या योजनेतून बांधून देण्यात येते. या योजनेची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तर शहरी भागासाठी नगर पंचायत, नगरपरिषद या स्थानिक यंत्रणेमार्फत करण्यात येते. घराच्या बांधकामासाठी क्षेत्रनिहाय कमाल खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यात ग्रामीण भागात घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना 1 लाख 32 रुपयांचे अनुदान दिले जाते. नक्षलग्रस्त डोंगर भागात बांधकामासाठी 1 लाख 42 हजार, नगरपंचायत, नगरपरिषद क्षेत्रासाठी शौचालय बांधकामासह 2 लाख 50 हजार इतके अनुदान लाभार्थ्यांस दिले जाते. योजनेच्या लाभासाठी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांस लाभार्थी हिस्सा भरण्याची आवश्यकता नाही. या लाभार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रातील लाभार्थ्यांस 7.5 टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. महानगरपालिका क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी 10 टक्के इतका लाभार्थी हिस्सा आहे. शहरी भागात दारिद्रय रेषेखालील पात्र लाभार्थ्यांनासुद्धा घरकुल योजनेचा लाभ देण्यात दिला जातो. अनुसूचित जातींमधील जे अपंग लाभार्थी दारिद्रय रेषेखाली नाहीत, ज्याचे अपंगत्व 40 टक्के पेक्षा अधिक आहे व वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत आहे, अशा अपंग लाभार्थ्यांना ते योजनेच्या उर्वरित अटी व शर्तींची पुर्तता करीत असल्यास त्यांना देखील रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य 15 वर्षे असणे आवश्यक. अर्जदाराच्या कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण क्षेत्रासाठी रुपये 1 लाख इतकी आहे. नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रासाठी 1 लाख 50 हजार इतकी आहे, योजनेचा लाभ कुटूंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येतो. लाभार्थ्यांचे शासनाच्या इतर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला असल्यास अशा लाभार्थ्यांचा घरकुलासाठी विचार केला जात नाही. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण यांच्याशी संपर्क साधावा. घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना - घरकुलाच्या ज्या लाभार्थ्यांकडे बांधकामासाठी जागा नाही, अशा लाभार्थ्यांसाठी पंडित दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत रमाई आवास योजनेतील ग्रामीण क्षेत्रातील दारिद्रय रेषेखालील पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी 50 हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. 0000000

No comments:

Post a Comment