Monday 12 October 2020

रेमेडीसेवीअर इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये यासाठी अद्यावत नोंदी ठेवा जिल्ह्यात सहवासितांचा शोध, तपासण्यांवर अधिक भर द्या. -- पालकमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

 

    



            जालना, दि. 12 (जिमाका):-  कोरोनाबाधित रुग्णांना देण्यात येणारे रेमेडीसेवीअर हे इंजेक्शन रुग्णांना रास्त दरात मिळण्याबरोबरच या इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये यासाठी अद्यावत नोंदी ठेवण्यात याव्या. तसेच जिल्ह्यात सहवासितांचा शोध, तपासण्यांवर अधिक भर देण्याचे निर्देश  राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री               श्री. टोपे बोलत होते. 

            यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उप विभागीय अधिकारी श्री सानप, भाऊसाहेब जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, डॉ. पद्मजा सराफ  आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जिल्ह्यात रेमेडीसेवीयर इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये यादृष्टीने जिल्ह्यात पुरवठा करण्यात येणाऱ्या या इंजेक्शनची अद्यावत नोंद ठेवण्यात यावी.  हे इंजेक्शन कुठल्या रुग्णालयाला पुरविण्यात आले, कोणत्या रुग्णाला देण्यात आले याबाबतचीही नोंद ठेवण्याच्या सुचना पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

            कोरोना बाधितांच्या संपर्कामधील सहवासितांचा अचुकपणे शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करण्यावर भर देण्याबरोबरच एका कोव्हीड बाधित रुग्णाच्या मागे 20 सहवासितांची शोध घेण्यात येऊन त्यांचे तातडीने अलगीकरण करण्याच्या यावे. जिल्ह्यामध्ये असलेल्या ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्या माध्यमातुन आरटीपीसीआर तपासणीची संख्या वाढविण्याबरोबरच जिल्ह्यातील कोव्हीड बाधितांची माहिती वेबपोर्टलवर नियमितपणे व जलदगतीने अपलोड होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले. 

            आरोग्याच्या सुविधा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येत असुन जिल्हा रुग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी यापूर्वी साडेआठ कोटी रुपये तर नव्याने अडीच कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. तसेच अंबड येथील रुग्णालयासाठीसुद्धा निधी मंजुर असुन आरोग्य सक्षमीकरणाच्यादृष्टीने करण्यात येणारी कामे दर्जेदार व गुणवत्तापुर्ण करण्याचे निर्देश देत जिल्ह्यात यापूर्वी 20 के.एल क्षमतेच्या ऑक्सिजन प्लँटची उभारणी करण्यात आली असुन नव्याने आणखीन 20 के.एल क्षमतेचा ऑक्सिजन प्लँट उभारण्यात येणार असल्याने रुग्णांना मुबलक प्रमाणात या माध्यमातुन ऑक्सिजनचा पुरवठा होणार असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले. 

            कोव्हीड बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात येते. संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यात आलेल्या व्यक्तींची नियमितपणे तपासणी करण्याबरोबरच या ठिकाणची नियमित स्वच्छता करण्याबरोबरच अलगीकरणामध्ये ठेवण्यात येणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जाही उत्तम राहील, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसेच कोव्हीड बाधित असलेले व उपचार घेत असलेल्या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातुन बोलता यावे, यादृष्टीकोनातुन आवश्यक ती व्यवस्था करण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

            जिल्ह्यातील बहुतांश मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचा समावेश महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये करण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांना उपचाराचे दर ठरवुन देण्यात आलेले आहेत.  ठरवुन दिलेल्या दरापेक्षा अधिक प्रमाणात दर रुग्णालयांना आकारता येणार नाहीत.  या सर्व खासगी हॉस्पीटलमध्ये देयकांची तपासणी करण्यासाठी लेखा परिक्षकांची नियुक्तीही करण्यात आली असुन त्यांच्या माध्यमातुन देयकांची काटेकोरपणे तपासणी करण्यात यावी. तपासणीमध्ये ज्याही रुग्णालयांनी अधिकचे दर आकारल्याचे दिसुन येईल, त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

            जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेचा सविस्तर आढावा घेताना या योजनेंतर्गत 95 टक्के कुटूंबांचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असल्याची माहिती पालकमंत्री श्री टोपे यांना यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.

            जिल्ह्यात दि. 11 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे.  ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टीने नुकसान झाले आहे त्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

*******

No comments:

Post a Comment