Thursday 22 October 2020

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोपविण्यात आलेली कामे जबाबदारीने पार पाडावीत कोव्हीड19 च्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घ्या -- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे निर्देश

 



        जालना, दि. 22 (जिमाका):- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2020 चा कार्यक्रम लवकरच घोषित होणार असुन या निवडणुकीमध्ये अधिकाऱ्यांना सोपविण्यात आलेली कामे जबाबदारीने पुर्ण करावीत. प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याबरोबरच कोव्हीड 19 च्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.

            औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2020 निवडणुकीच्या अनुषंगाने नोडल अधिकाऱ्यांची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.

            यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एन. सवडे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, प्र. उपजिल्हाधिकारी (निवडणुक) रवींद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे म्हणाले, 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2020 चा कार्यक्रम लवकरच निवडणुक आयोगाकडून घोषित होईल. त्यादृष्टीने सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना सोपविण्यात आलेली कामे जबाबदारीने पार पाडावीत.  लोकसभा विधानसभेच्या निवडणुका ह्या ईव्हीएम द्वारे घेण्यात येतात परंतु पदवीधर मतदारसंघाची निवडणुक ही मतपत्रिकेच्या माध्यमातुन घेण्यात येणार आहे.  कोव्हीडच्या अनुषंगाने या निवडणुकीमध्ये मास्क, सॅनिटाजर वापर तसेच ईतर आवश्यक बाबींची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी                   श्री बिनवडे यांनी यावेळी दिले.

            औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होतील, याची दक्षता घेण्यात यावी.  निवडणूक आयोग तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निवडणुकीसाठी देण्यात येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. निवडणुकीसाठी आवश्यक असणारी वाहने, मनुष्यबळ तसेच ईतर साहित्य उपलब्ध करुन घेण्याबरोबरच निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देत जालना जिल्ह्यामध्ये एकुण 74 मतदान केंद्रे असुन 27 हजार 937 मतदारांची नोंद असुन मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरु असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिली.

            प्र. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) रवींद्र परळीकर यांनी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांच्या जबाबदारीची माहिती देण्याबरोबरच निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सुचना केल्या.

*******

No comments:

Post a Comment