Tuesday 20 October 2020

अंबड तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतपीकांची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून पहाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत देण्यासाठी प्रयत्नशिल

 






            जालना, दि. 20 -   आज दि. 20ऑक्टोबर, 2020 रोजी अंबड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतपीकांची राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी वडीगोद्री मंडळ परिसरातील आंतरवाली सराटी येथील शेतकऱ्याच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन झालेल्या नुकसानीची पहाणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला धीर देण्याबरोबरच त्वरेने मदत करण्यासाठी शासन प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी माजी आमदार डॉ. कल्याण काळे, भीमराव डोंगरे, प्रकाश नारायणकर, कांताराव भागवत, तहसिलदार विद्याचरण कडवकर, उपविभागीय कृषी अधिकारी गजानन सोनकांबळे, तालुका कृषि अधिकारी सचिन गिरी आदींची उपस्थिती होती.

            यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री देशमुख यांनी आंतरवाली सराटी येथील शेतकरी लक्ष्मण मिसाळ यांच्या शेतामधील ऊस, कापुस, सोयाबीन यासह ईतर पिकांची पहाणी करत झालेल्या नुकसानीची शेतकऱ्याकडून माहिती घेतली. 

            अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे मोठे नुकसान झाले आहे.  राज्यात काही ठिकाणी अजुनही पाऊस सुरु असुन पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु आहे.  शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्री मंडळातील मंत्री प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पहाणी करत आहेत.  अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना धीर देणे, त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याबरोबरच झालेल्या नुकसानीची भरपाई देणे याला शासनाची प्राथमिकता असुन केंद्र राज्य शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यावेळी सांगितले.

*******

 

No comments:

Post a Comment