Tuesday 6 February 2024

टीबी निर्देशांकमध्ये जालना जिल्हा ग्रामीण भागातून राज्यात प्रथम क्रमांकावर

 





जालना, दि. 6 (जिमाका) :-  भारत सरकार यांचे "क्षयरोगमुक्त भारत" हे ध्येय सन 2025 पर्यंत साध्य करावयाचे आहे, जे की शाश्वत विकास ध्येयाच्या अपेक्षीत कालावधीपेक्षा 5 वर्ष अगोदर आहे. याकरीता जिल्ह्यामध्ये सदर कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून राज्यस्तरावर 80 जिल्ह्यांचे सन 2023 मधील ग्रामीण भागातून टीबी निर्देशांकामध्ये जालना जिल्ह्याचा निर्देशांक राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे.  

 जालना जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. राज्यस्तरावर 80 जिल्ह्यांचे सन 2023 मधील टिबी निर्देशांकाचे (टीबी इंडेक्स स्कोअर) अहवालाचे अवलोकन केले असता ग्रामीण भागातून टीबी निर्देशांकात संशयीत क्षयरुग्ण शोधणे, क्षयरुग्णांना वेळेत औषधोपचार देणे, सिबीनेंट तपासणी, एचआयव्ही तपासणी, एक्स-रे तपासणी, आरबीएस तपासणी, पोषण आहार योजनेचा दरमहा लाभ देणे, दरमहा पोषण आहार किट पुरविणे व पीएमटिपीटी औषधोपचार देणे आदिमध्ये राज्यात सर्वात चांगले असल्यामुळे जालना जिल्हा ग्रामीण भागातून प्रथम क्रमांकावर आहे. यानिमित्ताने दि. 23 जानेवारी 2024 रोजी पुणे यशदा येथे टीबीमुक्त पंचायत अभियानांतर्गत आयोजित कार्यशाळेत जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अश्वमेध जगताप यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अश्वमेध जगताप यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. क्षयरोग निर्देशांक वर्ष 2023 मध्ये क्षयरुग्ण शोधण्याचे वार्षिक उद्दीष्ट 2 हजार 780 असून जिल्ह्यात 2 हजार 250 क्षय रुग्ण शोधण्यात येवून सर्व लाभार्थी रुग्णांना पोषण किटचे वाटप करण्यात आले आहे. असे जिल्हा क्षयरोग अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे  कळविले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment