Tuesday 20 February 2024

बचत गटाच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रकारे मदत करू -- केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे उमेद्च्यावतीने जानकी जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनाचे संपन्न 22 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार प्रदर्शन कै. कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलात प्रदर्शनाचे आयोजन





 


जालना दि. 20 (जिमाका)- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदच्यावतीने तयार करण्यात येणाऱ्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, जेणेकरून  ग्रामीण भागातील महिला सक्षम होण्यास मदत होईल,  असे प्रतिपादन जिल्हास्तरीय जानकी वस्तू व प्रदर्शनाच्या  उद्घाटन प्रसंगी  केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाकडून ग्रामीण महिला स्वयंसहायता गटाच्या वस्तूंचा प्रदर्शन व विक्री महोत्सव दि. 20 ते 22 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जुना जालना येथील घायाळ नगरातील  कै. कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उदघाटन आज श्री. दानवे यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मंचावर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, माजी आमदार अरविंदराव चव्हाण, भास्कर आबा दानवे, बद्रीनाथ पठाडे, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य मिर्झा अन्वर बेग, रामेश्वर भांदरगे , प्रकल्प संचालक शिरीष बनसोडे यांची उपस्थिती होती.

श्री. दानवे म्हणाले की, ग्रामीण भागातील जनतेच्या गरजा लक्षात घेवून , महिला बचत गटांनी मालाचे उत्पादन केल्यास , गटांना आर्थिक स्वावलंबन होण्यास मदत होईल. देशाचे पंतप्रधान यांनी या महिला बचत गटांना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने लखपती दीदी हा उपक्रम सुरु केला आहे.  जिल्हयातील जास्तीत महिलांनी याचा लाभ घेवून आपली वेगळी ओळख निर्माण करावी, जिल्ह्यात आज 11 महिलांच्या शेती उत्पादक कंपन्या असून केंद्र व राज्य शासनाच्यावतीने 162 कोटी रुपयांचे वाटप केले आहे. त्यांना उमेद अंतर्गत आगामी कालावधीत विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात यावे.

उमेदमुळे महिलांमध्ये एकात्मता निर्माण होवून सांघिक प्रयत्न होत असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी आगामी कालावधीत मालाचे सादरीकरण, पॅकेजिंग, याकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे सांगितले. जिल्ह्यात आज रोजी 16 हजार 500 गट असून त्यातंर्गत 1 लाख 87 हजार महिलांना 2023 दरम्यान 101 कोटींचे आर्थिक कर्ज वितरण केले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. एसबीआय बँकेच्या वतीने 47 कोटी, एमजीबी बँकेच्या वतीने जाफराबाद तालुक्यासाठी 1 कोटी 12 लक्ष, बीओएम बँकेच्या वतीने जालना तालुक्यासाठी 1 कोटी 58 लक्ष, आयसीआयसीआय च्या वतीने घनसावंगी व मंठा तालुक्यासाठी 3 कोटी 75 लक्ष तर एचडीएफसी बँकेच्या वतीने बदनापूर , अंबड व परतूर तालुक्यासाठी 2 कोटी 20 लक्ष रुपयाच्या कर्जाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.     

ग्रामीण भागातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने उमेद व ग्राम विकास विभागाच्यावतीने दिनांक 20 ते 22 फेब्रुवारी या  तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शहरातील स्व. कल्याणराव घोगरे क्रीडा मंडळावर सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्वासाठी खुले  राहणार आहे. सदरील प्रदर्शनात जिल्ह्यातील निवडक बचत गटांचे 50 स्टोल लावले जाणार असून या ठिकाणी ग्रामीण भागातील महिलांनी बनवलेले लोणचे ,डाळी, फरसाण , चिवडा , सोय उत्पादने , मध, विविध प्रकारचे पापड , गोडंबी , लाकडी खेळणी , जाम, द्रोण ,पत्रावळे , लोकरीच्या आकर्षक वस्तू, हस्तकला वस्तू राहणार असून खवय्यासाठी अस्सल चविष्ट, व रुचकर शाकाहारी व मांसाहारी भोजन राह्रनार आहे. याशिवाय दही धपाटे , वांगे भरीत, झुणका भाकर , मिसळ वडापाव , काळा मसाला मटन भाकरी, बंजारा पातळ पोळी इत्यादी पदार्थ उपलब्ध  आहेत.

रात्रीच्या वेळी मनोरंजनसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास        उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी  अंकुश चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी   बालचंद जमधडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी  कोमल कोरे, कॅफो राजू सोळंके, कार्यकारी अभियंता सविता सलगर,तसेच तालुक्याचे गटविकास अधिकारी सह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी शैलेश चौधरी यांनी विशेष प्रयत्न केले.

-*-*-*-*-*-

 

 

 

No comments:

Post a Comment