Monday 26 February 2024

जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशान्वये कलम 144 (2) लागू

 


 

        जालना, दि. 24 (जिमाका) :- सगे सोयरे अधिसुचनेचे कायद्यात रुपांतर करुन, सगे सोयरे कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे दि. 10 फेब्रुवारी 2024 पासुन मौ. अंतरवाली सराटी, ता. अंबड, जि.जालना येथे उपोषणास बसले आहेत. या मागणीस पाठींबा देण्यासाठी जिल्हयातील विविध भागात आंदोलन, उपोषण चालु आहेत. सगे सोयरे अधिसुचनेचे कायद्यात रुपांतर करुन, सगे सोयरे कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी दि. 24 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण जालना जिल्हयामध्ये 60 ते 65 ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी मौ. अंतरवाली सराटी, ता.अंबड येथे मराठा समाजाची आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी घेतलेले बैठकीमध्ये यापुढील आंदोलन मुंबई येथे करणार असल्याचे तसेच त्यासाठी मुंबई येथे जाणार असल्याचे बैठकीमध्ये जाहीर केले असून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनास पाठींबा देण्यासाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जावू नये याकरीता आग्रही असल्याने मौ. अंतरवाली सराटी, ता. अंबड येथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमण्याची शक्यता असून त्यामुळे धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व तालुक्यातील इतर मार्गावर मोठया प्रमाणावर गर्दी जमून दळणवळण विस्कळीत होण्याची, सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत होण्याची, गर्दीमुळे सार्वजनिक शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे संपूर्ण अंबड तालुक्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.

       जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जालना यांना प्राप्त अधिकारान्वये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये संपुर्ण अंबड तालुक्याकरीता दि. 26 फेब्रुवारी 2024 रोजीचे  रात्री 12.01  वाजेपासून ते पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हा संचारबंदी आदेश दुकाने, आस्थापना यांनाही लागू राहतील. तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत, दरील आदेशामधून खालील बाबींना सुट राहील. शासकीय/निमशासकीय कार्यालये, शाळा/महाविद्यालये, राष्ट्रीय महामार्ग व इतर मार्गावरील वाहतूक,दूध वितरण,पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणा-या आस्थापना. असे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment