Thursday 29 February 2024

गोदा समृध्दी जालना कृषी महोत्सवाचे" 1 मार्चला उद्घाटन जालना येथील कलश सिड्स मैदानावर कृषी महोत्सवाचे आयोजन 5 मार्चपर्यंत कृषी महोत्सव

 

     जालना, दि. 29 (जिमाका) - कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या विद्यमाने जालना शहरात दि.1 ते 5 मार्च 2024 या कालावधीत भव्य "गोदा समृध्दी जालना कृषी महोत्सवाचे" आयोजन करण्यात आले आहे.  

     जालना येथील कलश  सिड्स मैदान, मंठा चौफुली येथे कृषी महोत्सव होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन  1 मार्च 2024  रोजी सकाळी 11.00 वाजता राज्याचे सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते तर केंद्रीय  रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास सर्व लोकप्रतिनिधी ही उपस्थित राहणार आहेत. या कृषी महोत्सवास जिल्ह्यातील शेतकरी बंधू-भगिनींनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

     कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार, शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण, समूह, गट संघटित करून स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करणे, कृषी विषयक परिसंवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणींद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता-खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास व विपणनास चालना देणे या या कृषी महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहेत.

     कृषी महोत्सवातील कृषी प्रदर्शन हा महत्त्वाचा घटक असून यामध्ये शासकीय दालन, विविध कंपन्यांचे स्टॉल्स, खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे.

     या सोबत जालना जिल्हयातील पिक परिस्थितीवर आधारित  बांबू लागवड, रेशीम लागवड , मोसंबी लागवड व सीताफळ, तूर, सोयाबीन लागवड या सारख्या  विविध पिकावर मार्गदर्शन करण्यासाठीं  चर्चा सत्र व कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे .

      लोककला, शालेय विद्यार्थ्याचं कलादर्शन देखील होणार आहे.

महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम यांचे आयोजन केले आहे याच काळात तृणधान्य आधारित पाक कला स्पर्धा व खरेदीदार विक्रेता संमेलन आयोजित करण्यात येणाऱ आहे. 1.5 टन वजनाचा रेडा हे  या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असणार आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment